पश्चिम घाट येथील ३० टक्के जंगल नष्ट | पुढारी

पश्चिम घाट येथील ३० टक्के जंगल नष्ट

कोल्हापूर; सागर यादव : जागतिक स्तरावरील जैवविविधतेने संपन्न असणार्‍या अतिसंवेदनशील भागापैकी एक असलेला ‘सह्याद्री’ म्हणजेच पश्चिम घाट. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 67 टक्के जंगल असणार्‍या या पश्चिम घाटात आता केवळ 37 टक्केच जंगल शिल्लक उरले आहे. या उर्वरित जंगलाच्या संरक्षणाबाबतही शासनाच्या सर्वच पातळ्यांवर उदासीनता आहे.

भारताच्या वसुंधरेच्या एकूण क्षेत्रफळाचा केवळ 5 टक्के भाग सह्याद्री पर्वतरांगांनी व्यापला आहे. देशातील सहा राज्यांतून ही पर्वतरांग जातेे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 75 वर्षांपूर्वी सह्याद्रीमध्ये 67 टक्के जंगल होते. आता केवळ 37 टक्के जंगल शिल्लक असून, यापैकी केवळ 12 ते 15 टक्के जंगलच संरक्षित आहे. पश्चिम घाटात विकासाच्या नावाखाली प्रचंड विध्वंस सुरू असल्याने वसुंधरेला जणू ओरबाडले जात आहे.

पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी नेमलेल्या गाडगीळ समितीच्या अहवालानुसार सह्याद्रीचा 95 टक्के भाग संरक्षित होणे गरजेचे आहे. मात्र, हे कोणत्याही राज्यांना मान्य नसल्याने गाडगीळ अहवाल स्वीकारण्यात आला नाही. यानंतर नेमलेल्या डॉ. कस्तुरी रंगन समितीने शिल्लक असणारे 37 टक्के जंगल सुरक्षित ठेवून इतर सर्व वापरा, अशी शिफारस केली. मात्र, उरलेले 37 टक्के जंगलाचेही संरक्षण करण्यात कमालीचे औदासिन्य सरकारी पातळीवर दिसत आहे.

घाटाची लांबी 1600 कि.मी., उंची 1200 मीटर

पश्चिम घाट हा भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्‍याशेजारी उभी असलेली पर्वतरांग आहे. त्याची लांबी सुमारे 1 हजार 600 किलोमीटर आहे. तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून ती रांग सुरू होते व महाराष्ट्र (440 कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत जाते. सह्याद्रीच्या पर्वत रांगेचा सुमारे 60 टक्के भाग कर्नाटकात आहे. या रांगेचे क्षेत्रफळ 60 हजार चौरस कि.मी. असून, त्याची सरासरी उंची 1200 मीटर आहे.

पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणार्‍या आठ ठिकाणांपैकी एक आहे. जगात सरपटणार्‍या प्राण्यांच्या 187 पेक्षा अधिक जाती असून, यापैकी निम्म्या जाती या केवळ सह्याद्री पर्वतरांगांत सापडतात. बेडकांच्या 100 पैकी 80 जाती, वृक्षमंडूकांच्या 35 पैकी 29 जाती, देवगांडुळांच्या 22 पैकी 20 जाती, मातीत पुरून राहणार्‍या बांडा सर्पकुलातील 45 पैकी 34 जाती पश्चिम घाटात आढळतात. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या 4 हजार आर्वाचीन जातींपैकी 1 हजार 400 जाती येथे आढळतात. 5 हजारपेक्षा जास्त फुलझाडे, 139 प्राण्यांच्या जाती, 508 पक्ष्यांच्या जाती व 179 उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात, तर पश्चिम घाटातील 325 प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट होत आलेल्या प्रजातींपैकी आहेत.

बेसाल्टसह विविध खडक

सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी, असे संशोधक मानतात. ‘बेसाल्ट’ खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक असून इतर खडकांमध्ये चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट, लॅटराईट व बॉक्साईट यांचा समावेश आहे.

1988 ला जैविक क्षेत्र घोषित

1988 मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. भारतातील उंच वाढणार्‍या झाडांच्या 15 हजार जातींपैकी सुमारे 4 हजार जाती (27 टक्के) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे 1 हजार 800 जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ 84 उभयचर प्राण्यांच्या जाती, 16 पक्ष्यांच्या जाती, 7 प्रकारचे सस्तन प्राणी व 1 हजार 600 प्रकारची फुलझाडे आढळतात; जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत.

अनेक नद्यांचे उगमस्थान

पश्चिम घाट मोसमी वार्‍यांना अडवतो. त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होऊन पाऊस पडतो. पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे 3 ते 4 हजार मिलिमीटर आहे. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. अनेक नद्यांवर धरणे बांधण्यात आली असून, यातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते.

आज पश्चिम घाटातील केवळ 12 ते 15 टक्केच जंगल संरक्षित आहे. खासगी जंगलक्षेत्र पूर्णपणे नष्ट झालेले आहे. आजही संरक्षित वन क्षेत्रात विकास प्रकल्प, घाट रस्ते, उद्योग, पर्यटन अशा विविध कारणांसाठी जंगले नष्ट होऊ लागल्याने पश्चिम घाटाची स्थिती चिंताजनक आहे.
– डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज

Back to top button