कागल : मुश्रीफांचा जन्म रामनवमीचा नव्हे, तर रंगपंचमीचा : घाटगे | पुढारी

कागल : मुश्रीफांचा जन्म रामनवमीचा नव्हे, तर रंगपंचमीचा : घाटगे

कागल : पुढारी वृत्तसेवा

हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीमध्ये भगवान श्रीराम यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. रामनवमीच्या दिवशी हसन मुश्रीफ यांचा जन्म झाला नाही, तर तो रंगपंचमीला झाला आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे आम्ही उपलब्ध करून दिली असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. याच जाहिरातीसंदर्भात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागलमध्ये मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी याबाबत विधी विभागाचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करू, असे सांगितले.

घाटगे म्हणाले, मुश्रीफ यांचा जन्म रामनवमीचा नसताना गेली चाळीस वर्षे खोटे बोलून ते बहुजन समाजाची फसवणूक करीत आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेले कागदपत्रांमध्ये असलेल्या जन्मतारखेदिवशी रामनवमी नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी जी जन्मतारीख दिली आहे त्या दिवशी रंगपंचमी होती. असे असताना सध्या ते खोटे रंग उधळत आहेत.

खोटी जन्मतारीख सांगून बहुजन समाजाचा मुश्रीफ यांनी अपमान केला आहे, असे स्पष्ट करून घाटगे यांनी कागल येथील राम मंदिर आपण बांधले. विक्रमसिंह घाटगे यांनी केवळ पंचवीस हजार रुपये दिले असे बोलून त्यांनी राजेंचा अपमान केला आहे. राम मंदिर उभारणीसाठी गोळा झालेली वर्गणी ही त्यांच्या वडिलांची होती काय, असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या एका जाहिरातीमध्ये प्रभू रामचंद्रांचा एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याने पोलिस ठाण्याच्या दारात समर्थकांसह ठिय्या मारला.

प्रभू रामचंद्रांचा एकेरी उल्लेख बदनामीकारक असून याबाबत मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी समरजितसिंह घाटगे यांनी केली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलक घोषणा देत कागल पोलिस ठाण्यावर आले. मोर्चात मुश्रीफ यांची जाहिरात असलेला बॅनर उलटा धरण्यात आला होता. समरजित घाटगे, सत्यजित कदम व इतर कार्यकर्ते पोलिस ठाण्यामध्ये गेले. त्यांनी करवीर विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अजयकुमार जाधव यांची भेट घेतली.

मुश्रीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी जाहिरातीचे कात्रण तसेच इतर कागदपत्रे सादर केली. दाखल केलेल्या कागदपत्रांवरून विधीतज्ज्ञांचा सल्ला घेऊन कारवाई करू, असे पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. समरजितसिंह घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर प्रकाश गाडेकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विधितज्ज्ञांशी चर्चा करून मुश्रीफ यांच्यावर सात दिवसांत गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेऊ, असे पोलिसांनी आश्वासन दिल्यावर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

मंडलिक व राजेंच्या पाठीत खंजीर खुपसून मुश्रीफ मोठे झाले!

राम मंदिराच्या ठिकाणी आमचा वाडा होता. तो वाडा पाडून हे मंदिर उभारण्यात आले आहे. मुश्रीफ यांनी आजवर कुणाला एक गुंठा जमीन तरी दिली आहे का? मी कोणालाही घाबरत नाही. त्यांना काय करायचे असेल ते करू दे, माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असतील तरी ठोकू देत. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या पाठीत खंजीर खुपसूनच मुश्रीफ मोठे झालेले आहेत, असेही घाटगे म्हणाले.

माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यावर दोन गुन्हे

कागल : भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी महापौर सुनील कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यावर कागल पोलिसांत दोन दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. समरजितसिंह घाटगे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मिरवणुकीच्या कार्यक्रमात प्रकाश गाडेकर यांनी ‘राजकारणात अजून बच्चा आहे’, ‘तुम्हाला बघून घेतो’ असे बदनामीकारक वक्तव्य केले आहे. सुनील कदम (रा. कोल्हापूर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश गाडेकर यांनी त्यांच्या भाषणांमध्ये शिवीगाळ करून ‘तुम्हाला बघून घेतो’, असे वक्तव्य केले आहे. या दोन्ही तक्रारीनुसार गाडेकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

Back to top button