दामदुप्पटच्या आमिषाने 160 कोटींचा गंडा | पुढारी

दामदुप्पटच्या आमिषाने 160 कोटींचा गंडा

कुरूंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : दामदुप्पट रक्‍कम मिळण्याच्या आमिषाने काही कंपन्या व दलालांवर विश्‍वास ठेवून कुरूंदवाड परिसरातील अनेकांनी शेअर्ससारख्या ट्रेडिंग कंपन्यांत रक्‍कम गुंतवली. मात्र, आता गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, 100 ते 160 कोटी रुपयांच्या घरात ही रक्‍कम असल्याचे समजते. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना रक्‍कम न देता पोबारा केल्याचे समोर आले आहे.

यामध्ये मजरेवाडी येथील एका शेतकर्‍याने सव्वा कोटी रुपये, तर शहरातील एका बड्या राजकीय व्यक्‍तीने सुमारे 90 लाख रुपये गुंतवले आहेत. यामध्ये तालुक्यातील अनेक शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना गोड बोलून व प्रलोभने दाखवून हा गंडा घातला आहे. आता या कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

कुरूंदवाड व राजवाडा परिसरातील काही शेतकर्‍यांनी 70 कोटी रुपये यामध्ये गुंतवले आहेत. बाजारपेठेतील तबक उद्यान येथील काही व्यापार्‍यांनी भांडी व कॉस्मेटिक ज्वेलरी दुकान असणार्‍या ट्रेडिंग कंपनीच्या दलालांकडे 2 कोटी रुपयांच्या जवळपास रक्‍कम गुंतवली आहे.

औरवाड येथील काही शेतकरी व शिक्षकांनी आपले स्वतःचे व पै-पाहुण्यांकडील मिळून जवळपास 80 कोटी रुपये गुंतवले आहेत.
मजरेवाडी येथील एका बागायतदार शेतकर्‍याने सुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.कुरूंदवाड शहरातील काही राजकीय नेत्यांनी 1 कोटी 65 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे समजते. मात्र, आता फसवणूक झाली असली, तरी ते प्रतिष्ठेपोटी पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मारा, अशी त्यांची स्थिती झाली आहे.

जादा पैशांच्या मोहापोटी…

बँका, पतसंस्था आणि पोस्टातील विविध योजनांतील गुंतवणुकीचे व्याज दर कमी होत आहेत. मात्र, ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कमी काळात दामदुप्पट रक्‍कम मिळते, अशी आमिषे गुंतवणूकदारांना दलालांनी दाखवल्याने अनेकजण या मोहात अडकले.

गुंतवणूकदारांना अप्रतिष्ठेची भीती

ट्रेडिंग कंपनीच्या दलालांनी 80 दिवसांत दामदुप्पट आणि दररोजच्या कमिशनचे आमिष दाखवत ट्रेडिंग कंपनीच्या खात्यावर रक्‍कम जमा करून घेतली. कंपनीने गाशा गुडाळल्यानंतर गुंतवणूकदारांना दलालच पोलिसांत तुम्ही तक्रार द्यायला गेल्यावर गुंतवलेले पैसे कुठून आणला याची चौकशी लागेल, असे सांगत त्यांना प्रतिष्ठा धोक्यात येण्याची भीती दाखवत आहेत.

Back to top button