‘कोल्हापूर उत्तर’साठी टपाली मतदान प्रक्रिया सुरू; पहिल्या दिवशी २०८ जणांचे मतदान | पुढारी

‘कोल्हापूर उत्तर’साठी टपाली मतदान प्रक्रिया सुरू; पहिल्या दिवशी २०८ जणांचे मतदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 80 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान सुरू झाले. पहिल्याच दिवशी 688 पैकी 208 मतदारांनी मतदान केले. आयोगाने सुरू केलेल्या या नव्या सुविधेबाबत मतदारांसह नातेवाईकांनी समाधान व्यक्‍त केले.

‘कोल्हापूर उत्तर’साठी येत्या मंगळवारी (दि.12) मतदान होणार आहे. तत्पूर्वी वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या टपाली मतदानाला प्रारंभ झाला आहे. शुक्रवार (दि.8) पर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. या मतदानासाठी 12 पथके तैनात केली असून, सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे टपाली मतदान घेतले जात आहे.

मतदारांना पूर्णपणे गोपनीय पद्धतीने मतदान करता यावे याकरिता त्यांच्या घरातच मतदान बूथ लावून काही काळापुरते मतदान केंद्रच उभे केले जात आहे. मतदान केल्यानंतर मतपत्रिका लखोट्यात घालून मतदाराला मतपेटीत टाकावी लागते. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या या मतदानाबाबत मतदारांसह नागरिकांतही उत्सुकता होती. अनेकांनी घरातील नातेवाईकांचे मतदान करतानाच्या छब्या टिपल्या. पहिल्या, दुसर्‍या मजल्यासह नोंदणी केलेला मतदार जिथे असेल, त्या ठिकाणी जाऊन मतदान कर्मचार्‍यांनी ही मतदान प्रक्रिया पार पाडली.

Back to top button