कोल्हापूर : पुलाची शिरोली येथील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणातील मूकमोर्चास हिंसक वळण | पुढारी

कोल्हापूर : पुलाची शिरोली येथील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणातील मूकमोर्चास हिंसक वळण

शिरोली एमआयडीसी (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : पुलाची शिरोली येथील आयर्न हेरंब बुडकर आत्महत्या प्रकरणी सिम्बॉलिक स्कूलचे अध्यक्ष गणपत जनार्दन पाटील व मुख्याध्यापक गीता गणपत पाटील यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आर्यनच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मुकमोर्चास हिंसक वळण लागले. यावेळी झालेल्या दगडफेकीत शाळेच्या इमारतीच्या काचा तसेच सुरक्षाक्षकांची केबीन देखील फोडण्यात आली.

पुलाची शिरोली येथील आर्यनच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना अटक करावे. तसेच यापुढे आणखी आयर्न सारख्या निष्पाप जीवांचा बळी जाऊ नये यासाठी या शाळेची मान्यता रद्द करावी या मागण्याकरिता शिरोली कृती समीतीच्या वतीने जनअंदोलन करण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी शाळेवर मुक मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा शाळेच्या आवारात जाताच जनप्रक्षोभ उफाळून आला. शाळेवर यावेळी दगड फेक करण्यात आली. यावेळी सुरक्षारक्षकाची केबिन, इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या क्लासरूम व प्रयोगशाळेच्या काचा फोडण्यात आल्या. शाळेमध्ये असणारे विद्यार्थी आणि शिक्षक यामुळे घाबरले होते.

यावेळी शाळेमध्ये दहावीचे पेपर ही सुरू होते. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मोर्चाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

आर्यन बुडकर याच्या आत्महत्येस कारणीभूत शिक्षण संस्था चालकांना तात्काळ अटक अन्यथा पुढील मोर्चा पोलिस ठाण्यावर काढणार असल्याचा इशारा सरपंच शशिकांत खवरे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश फोंडे यांनी यावेळी दिला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांनी निवेदन स्विकारले. तसेच संबंधितांना तत्काळ अटक करत न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले.

मोर्चासाठी सकाळी अकरा वाजता शिरोली ग्रामपंचायतीसमोर सिम्बॉलिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असणार्‍या विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ जमले. यावेळी गिरीश फोंडे यांनी शांततेचे आवाहन करत मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच निवेदनातील मजकूर वाचून दाखवला. त्यानंतर सरपंच शशिकांत खवरे यांनी मोर्चा संदर्भात काही सूचना दिल्या. त्यानंतर मोर्चास सुरवात झाली.

हा मोर्चा गावातून शाळेसमोर आला. दहावीची परीक्षा सुरू असल्याने मोर्चाला शाळेच्या फाटकावर रोखले. यावेळी शाळेच्या फाटकावर शाळा प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आर्यनच्या श्रध्दांजलीचा फलक मोर्चात सहभागी तरुणांनी काढून टाकला. मोर्चाहून परत जात असताना काही तरुणांनी दगडफेक केली.

या अंदोलनात तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, उपसरपंच सुरेश यादव बाजीराव पाटील, महेश चव्हाण, बाजिराव सातपुते, राजू सुतार, मन्सूर नदाफ, लियाकत गोलंदाज यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने हजर होत्या.

Back to top button