पुणे : पुढारी वृत्तसेवा
कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिरातील लोखंडी पाईपला लटकलेल्या व्यक्तीचा खून त्याची पत्नी व अल्पवयीन मुलानेच केल्याचे समोर आले आहे. आईला सतत मारहाण करत असल्यामुळे मुलाने पित्याचा गळा आवळून डोके भितीवर आपटले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर मायलेकानी मृतदेह लोखंडी पाईपला लटकवून त्याने आत्महत्या केली, असा बनाव केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी शालन प्रकाश जाधव (वय 40 रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, कात्रज) या महिलेला अटक केली आहे. तर, तिच्या 17 वर्षाच्या मुलास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या घटनेत प्रकाश किसन जाधव (वय 42) या व्यक्तीचा खून झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील लक्ष्मीमाता मंदीराजवळ जाधव कुटूंबिय राहायला आहेत. त्यांना 17 वर्षांचा मुलगा आहेत. 1 एप्रिलच्या पहाटेला लक्ष्मीमाता मंदिरात प्रकाश जाधव यांचा मृतदेह पाईपला लटकेलेल्या आवस्थेत आढळला. त्यानंतर जाधव यांच्या आत्महत्येची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवला.
वैद्यकीय तपासणीत प्रकाश यांचा मृत्यू गळा आवळल्याने, तसेच डोक्याला जबर मार लागल्यामुळे झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांनी चौकशीला सुरवात केली. प्रकाश हे त्या दिवशी कोठे गेले होते का, कोणा सोबत वाद झाला होता का, याची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी पत्नीसोबत वाद घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेथेच जाधव कुटुंबातील व्यक्तींवर पोलिसांचा संशय बळावला. पत्नी व मुलाकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर संशय आला. कसून चौकशी केल्यानंतर पत्नी आणि मुलाने मिळून हा खून केल्याची कबुली दिली. खुनाचा छडा वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे निरीक्षक संगिता यादव, पोलिस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अमंलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, गणेश शेंडे यांच्या पथकाने लावला.
संशयीत आरोपी महिला शालन जाधव चौकशीत बोलती झाली. 'गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश हे माझ्या चारित्र्यावर संशय घेत होते. त्यामुळे आमच्यात वादावादी होत होती. 31 मार्चला आमच्या दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाल्यामुळे अल्पवयीन मुलाने वडीलांचा गळा आवळून त्यांचे डोके भिंतीवर आदळले. त्यामुळे प्रकाश हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आम्ही दोघांनी प्रकाश यांचा मृतदेह चादरीत गुंडाळून घराजवळील मंदीरात नेला. त्या ठिकाणी लोखंडी पाईपला मृतदेह लटकवून प्रकाश यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला,' असे या आरोपी महिलेने पोलिस तपासात सांगितले.
– जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे