‘उत्तर’चा निकाल महाविकास आघाडीविरोधातील कौल असेल | पुढारी

‘उत्तर’चा निकाल महाविकास आघाडीविरोधातील कौल असेल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष नक्कीच विजयी होईल. हा निकाल म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील जनतेचा संतप्त कौल असेल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ज्या फुले, शाहू, आबेडकर यांचे नाव घेऊन महाविकास आघाडी सरकारने सत्ता व राजकारण केले, त्या सरकारला मराठा समाजाचे आरक्षण टिकविता आले नाही. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारच्या नाकर्तेपणामुळे टिकले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजास आरक्षण दिले. मात्र महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण टिकले नाही. अशीच स्िथती ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची आहे, असेही उपाध्ये म्हणाले.

इम्पिरिकल डेटा न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षणही टिकले नाही. हे सरकार ओबीसी, मराठा विरोधी असून या समाजावर सरकारने अन्याय केल्याचे सांगून उपाध्ये म्हणाले, कोणत्याही घटकाचे या सरकारकडून समाधान झाले नाही. एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. या सरकारचे ‘विकास थांबवा, गोंधळ, भ—ष्टाचार वाढवा’ हे धोरण आहे. थेट दाऊदशी संबंध असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक आजही मंत्री आहेत.

त्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस या सरकारकडे नाही. राज्यातील जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. या निकालातून सरकारला चले जाव सांगण्याची सुरुवात होणार आहे. राज्यातील सर्वच घटक नाराज असून या नाराजीतून राज्यात संतापजनक चित्र आहे. पत्रकार परिषदेस महेश जाधव, विजय जाधव, अशोक देसाई, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये उपस्िथत होते.

Back to top button