कागल तालुक्यातील तलाठी नायब तहसिलदारांसह वास्तूशांतीसाठी भरदुपारी हातकणंगलेला ! | पुढारी

कागल तालुक्यातील तलाठी नायब तहसिलदारांसह वास्तूशांतीसाठी भरदुपारी हातकणंगलेला !

कागल, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यात एका तलाठीने बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी कागल तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील बहुतांशी तलाठी आणि काही कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचारी यांनी भरदुपारी कार्यालयीन वेळेत हातकणंगले तालुक्यात जाऊन कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे कागल येथील कार्यालयात दुपारनंतर शुकशुकाट होता. परिणामी महत्त्वाच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना परत फिरावे लागल्याने त्यांचा हेलपाटा झाला. याबाबतची चर्चा नागरिकांमधून सुरू होती.

कागल तालुक्यातील साके येथे कार्यरत असलेले तलाठी यांनी आपल्या हातकणंगले तालुक्यातील एका गावात घर बांधले आहे. या घराच्या वास्तुशांतीचे निमंत्रण त्यांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेले होते. त्या आमंत्रणाचा मान राखून अधिकारी आणि कर्मचारी यांनी तिथे जाऊन हजेरी लावली. कार्यालयातील एका विभागाच्या नायब तहसीलदार यांनी तर स्वतः गाडी चालवत काही महिलांचे सारथ्य केले. तर इतर गाड्यांमधून कर्मचारी गेले होते. तर मोटरसायकलवरून आणि खासगी गाडीतून गेलेले कर्मचारी वेगळेच होते. त्यामुळे दुपारनंतर महसूल विभागामध्ये कर्मचारी अभावी शुकशुकाट निर्माण झाला होता. कामासाठी येणार्‍या नागरिकांना उद्याचा दिवस दिला जात होता. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. शासकीय सुट्ट्यांमुळे नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. त्यात आता कार्यालयीन वेळेत वास्तुशांतीसाठी कर्मचारी गेल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

Back to top button