नाशिक : कुरीयर कंपनीला कॉल करणे भोवले ; वृद्धास 99 हजार 999 रुपयांना गंडा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; कुरीअर सर्व्हिसचा संपर्क क्रमांक संकेतस्थळावर शोधणे ६३ वर्षीय वृद्धास महागात पडले आहे. भामट्यांनी वृद्धास मदत करण्याच्या बहाण्याने गंडा घालत त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वामन नामदेव गायकवाड (६३, रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार ते १९ मार्च रोजी इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधत होते. त्यावेळी तेथे असलेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता भामट्याने त्यांच्याशी संवाद साधला. कुरीअर परत पाठवायचे असल्यास तुम्हाला १५ रुपये अतिरीक्त शुल्क लागेल असे भामट्याने गायकवाड यांना सांगितले. त्यामुळे गायकवाड यांनी भामट्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पैसे पाठवले मात्र ते गेले नाही. दाेनदा प्रयत्न करूनही पैसे गेले नाही. मात्र भामट्याने गायकवाड यांच्या बँक खात्यातून 99 हजार 999 रुपये परस्पर काढून घेतले. ही माहिती मिळताच गायकवाड यांनी पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

