Vaccination : मुलांच्या लसीकरणाची गती वाढविण्याचे आव्हान | पुढारी

Vaccination : मुलांच्या लसीकरणाची गती वाढविण्याचे आव्हान

कोल्हापूर ; विकास कांबळे : तोंडावर आलेल्या परीक्षा, सकाळी सुरू झालेल्या शाळा, पूर्ण क्षमतेने सुरू नसलेली एस.टी.ची सेवा यामुळे 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination) कासव गतीने सुरू आहे. या लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्याला मर्यादा येत असल्यामुळे 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाला पुढील शैक्षणिक वर्षातच गती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानंतर या वयोगटातील मुलांची संख्या निश्‍चित करण्यात आली. जिल्ह्यात 1 लाख 29 हजार 202 इतकी मुले या वयोगटात आढळून आली.

या वयोगटातील सातवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. त्यामुळे आरोग्य विभागाने या मुलांना शाळेतच लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे शाळा सकाळी भरविण्यात येत आहेत. एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपामुळे अजून बससेवा सुरळीत झालेली नाही.

ग्रामीण भागातील मुलांना अजूनही शाळेत जाण्यासाठी लाल परीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सकाळी दहा वाजता किंवा साडेनऊ वाजता एखाद्या ठिकाणी बस असेल तर त्यावेळेत बसने येणार्‍या मुलांना सोडले जाते. त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतरच्या परिणामाबद्दल पालकांच्या मनात अजूनही भिती आहे.

त्यामुळे परीक्षा झाल्यावर लसीकरणाचे पाहू, अशी पालकांची भूमिका आहे. त्याचा परिणाम या लसीकरणाला (Vaccination) अद्याप गती येऊ शकली नाही. गेल्या आठवडाभरात केवळे सहा टक्के मुलांनी डोस घेतला आहे. ग्रामीण भागातील केवळ 7 हजार 173 मुलांनी आतापर्यंत लस घेतली आहे. डोंगराळ तालुक्यात रविवारपर्यंत लसीकरणाला सुरुवात देखील झालेली नव्हती.

Back to top button