कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबलच’! मेळाव्याला शिवसैनिक उपस्थित राहणार ? | पुढारी

कोल्हापूर उत्तर : राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबलच’! मेळाव्याला शिवसैनिक उपस्थित राहणार ?

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी होणार्‍या महामेळाव्याला शिवसैनिकांना उपस्थित राहण्याबाबतचे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले पण शिवसैनिकांच्या उपस्थितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार जयश्री जाधव, माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट दिली पण क्षीरसागर कोल्हापुरात नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणूुीसाठी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी शिवसेनेने केली होती. माजी आमदार राजेश क्षीरसागर पूर्ण तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार होते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत ही जागा काँग्रेस पक्षाला सोडली. या निर्णयाने शिवसैनिक काहीसे नाराज आहेत.

आज होणार्‍या मेळाव्याला शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याबाबत निरोप देण्यात यावेत, असे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शहरप्रमुख जयवंत हारुगले यांना सांगितले आहे. राजेश क्षीरसागर यांच्याशीही चर्चा करून केशवराव भोसले नाट्यगृह येथे हेाणार्‍या महामेळाव्याला उपस्थित राहण्याबाबत बोलणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी जयश्री जाधव, सचिन चव्हाण कार्यकर्त्यांसह राजेश क्षीरसागर यांची भेट घेण्यासाठी शनिवार पेठ येथील निवासस्थानी गेले होते, पण त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे सौ. वैशाली क्षीरसागर यांची भेट घेऊन महाविकास आघाडीच्या रविवारी होणार्‍या मेळाव्याला क्षीरसागर यांनी उपस्थित राहण्याबाबत विनंती केली. सौ. क्षीरसागर यांनी ‘राजेश क्षीरसागर बाहेर गावी आहेत. आल्यानंतर निरेाप देऊ’, असे सांगितले. दरम्यान क्षीरसागर हे ‘नॉट रिचेबल’ असल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.

Back to top button