इचलकरंजी : डबडबलेल्या डोळ्यांनी पूरग्रस्त परतू लागले | पुढारी

इचलकरंजी : डबडबलेल्या डोळ्यांनी पूरग्रस्त परतू लागले

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी काहीसे ओसरू लागल्याने स्थलांतरित नागरिक घरी परतत आहेत. चांदणी चौक परिसर, परीट गल्ली, गर्जना गल्ली, दुर्गामाता गल्ली आदींसह काही ठिकाणच्या घरांतील पाणी उतरल्याने साफसफाईचे काम सुरू होते.

डबडबलेल्या डोळ्यांनी घरातील चिखल हटवत पुन्हा एकदा साहित्य सावरण्याचे काम कुटुंबीयांकहून करण्यात येत होते. काही सलून तसेच किराणा दुकानासह व्यावसायिकांनाही नुकसान पाहून अश्रू अनावर झाले होते. अद्यापही काही भागातील पाणी कायम असल्याने ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महापुराचा फटका तब्बल 20 हजारांहून अधिक नागरिकांना बसला आहे. गावभाग व जुना चंदूर रोड परिसर पाण्याखाली गेला आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात पाणी नागरी वस्तीमध्ये असले तरी काही भागात संथ गतीने पाणी पाठीमागे जात असल्यामुळे काही गल्ल्या, घरे यांच्यातील पाणी ओसरले आहे. मंगळवारीही पावसाची उघडीप असल्यामुळे आणि घरातील पाणी ओसरल्यामुळे नागरिकांची सफाईसाठी लगबग सुरू होती.

घरातील साहित्याचा झालेला चिखल पाहून अनेकांना अश्रू अनावर होत होते. अनेकांच्या घराची दुरवस्था झाली आहे. भिंतीला तडे गेले आहेत. छतही आता कोसळण्याच्या अवस्थेत आहे. डोळ्यांतील अश्रू लपवत एकमेकांना आधार देत स्वच्छता करण्याचे काम करण्यात कुटुंबातील सर्वांचेच हात गुंतल्याचे चित्र होते. पाण्यामुळे इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले. त्यामुळे ते फेकून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

चारशेहून अधिक यंत्रमाग कारखाने पाण्याखाली

काही ठिकाणी पाणी ओसरल्याने दुकाने उघडण्यास सुरुवात झाली. डोळ्यासमोरच साहित्य खराब झाल्यामुळे तसेच काही ठिकाणी अद्यापही दुकानांमध्ये पाण्याची पातळी अधिक असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. पुराच्या पाण्याचा यंत्रमाग व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. 400 हून अधिक कारखाने पाण्याखाली गेले आहेत. अद्याप बहुतांशी भागातील पूरस्थिती कायम असल्याने नुकसानीची दाहकता अजून समोर आली नाही. मात्र पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Back to top button