हुपरी : पुढारी वृत्तसेवा
हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कलश बसवण्याच्या कामास प्रारंभ झाला. ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेचे दर्शन घेऊन व पूजन करुन पाच फूट उंचीच्या कळसावर सोन्याचा मुलामा व नक्षी कामाचा प्रारंभ राजस्थानी कारागीरांकडून सुरू झाले आहे.
धडी उत्पादक संघटनेच्या पुढाकाराने श्री अंबाबाई भक्त मंडळ, चांदी कारागीर आणि अंबाबाई भक्ताच्या सहकार्याने हे कार्य सुरू आहे.
धडी उत्पादक म्हणजे चांदी उद्योगातील महत्त्वाचा घटक आहे. या धडी उत्पादकांनी एकत्र येऊन भक्त व ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेच्या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कलश बसवण्याचा एकमुखी निर्धार केला होता. कोल्हापुरात सोन्याचा पाष्टा तयार करण्याचे काम पूर्ण झाले.
आज यशवंतराव पाटील, संजय माने, शिवाजी हांडे, उदय वाशीकर, आनंदा जाधव, अमित नरके, अभिनंदन गाट, शहाजीराव गायकवाड, संजय घोरपडे, पिंटू मगदुम, शंकर जाधव, दीपक चव्हाण, गणेश बंडगर, रोहन माळी, मनोज चौगुले, विजय जोशी, प्रकाश देशपांडे, प्रकाश लाड, अशोक सुतार आदींच्या उपस्थितीत सुवर्ण कलश निर्माण कार्याचे शुभारंभ करण्यात आला.
शिखरावर ५ फूट उंच, ३५ किलो तांबे वापरून कळस बनवला आहे. त्यावर ६०० ग्रॅम सोन्याची नक्षी व मुलामा देण्याचे काम सुरू झाले आहे.