युक्रेन अण्विक प्रकल्प : आग विझली पण चेर्नोबिलपेक्षा १० पट धोका कायम | पुढारी

युक्रेन अण्विक प्रकल्प : आग विझली पण चेर्नोबिलपेक्षा १० पट धोका कायम

कीव्ह : वृत्तसंस्था : युक्रेनमधील झापोरिझाझा या अण्विक वीजनिर्मिती केंद्राला लागलेली आग विझवण्यात आलेली आहे. पण जर या अण्विक वीजनिर्मिती केंद्राचा स्फोट झाला तर चेर्नोबिलपेक्षा १० पट मोठा किरणोत्सर्ग होईल, असा इशारा युक्रेनने दिलेले आहे.

CNN आणि इतर वृतसंस्थांनी याबद्दचे वृत्त दिलेले आहे. हे अण्विक वीजनिर्मिती केंद्र युरोपमधील सर्वांत मोठे आहे.

रशियाने केलेल्या बाँब वर्षावात या अण्विक वीजनिर्मिती केंद्राला पहाटे मोठी आग लागली. त्यानंतर ही युद्धपातळीवर आग विझवण्यात आली. युक्रेनचे ऊर्जामंत्री जर्मन गालुचेनेस्को यांनी अमेरिकेचे ऊर्जामंत्री ग्रॅन होम यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

शत्रूराष्ट्र अण्विक केंद्राबद्दलही संवेदनशील नाही. युक्रेन आणि युरोपचे नागरिक आणि रशियाच्या नागरिकांच्या जीवनाचीही त्यांना काळजी नाही, असे त्यांनी म्हटलेले आहे.

इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सीला आम्ही यापूर्वीच अशा धोक्यांची कल्पना दिली होती. आता आंतरराष्ट्रीय संघटनांनी मध्यस्ती करण्याची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले.

पहाटे २.३० वाजता ही आग लागली. त्यानंतर ६.२० मिनिटांनी ही आग विझवण्यात आली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याठिकाणाचा संघर्ष सध्या तरी थांबलेला आहे.

अण्विक केंद्राचे किती नुकसान?

या संदर्भात कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण या प्रकल्पाच्या महत्त्वाचे घटक सुरक्षित आहेत, असे येथील प्रवक्त्याने सांगितलेले आहे.

किरणोत्सर्ग झाला आहे का?

या प्रकल्पाला लागलेल्या आगीनंतर या परिसरात किरणोत्सर्गात वाढ झाल्याचे आढळून आलेले नाही, असे युक्रेन आणि अमेरिकेतील संस्थांनी म्हटलेले आहे.

घडलेला प्रकार किती गंभीर?

जर आग रिअॅक्टरला लागली तर कुलिंग सिस्टम बिघडू शकते. तसे झाले तर मात्र हा प्रकल्प वितळून जाईल आणि तेथून किरणोत्सर्ग सुरू होईल. पण अजून तरी असा प्रकार घडलेला नाही.

Back to top button