पुणे : पुढारी वृत्तसेवा
'भारतीय समाजमनाचे दर्शन आणि देशाचे सामाजिक, राजकीय वर्तमान चित्रपटांतून समजते. भारत समजून घ्यायचा असेल, तर व्यावसायिक चित्रपट पाहिला पाहिजे,' असे मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी (दि.3) व्यक्त केले.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजिलेल्या 20 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ) उद्घाटन जावेद अख्तर आणि शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अख्तर बोलत होते. 'पिफ'चे संचालक डॉ. जब्बार पटेल, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सतीश आळेकर आदी उपस्थित होते.
अख्तर म्हणाले, 'चित्रपटांमध्ये गाणी कशाला, असे विचारले जाते. वास्तविक भारतीय चित्रपटांतील गाणी आणि गीतलेखन केवळ प्रेमासाठी नाही. चित्रपट गीतांमध्ये लोकांचा विचार आणि समाजमनाचे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे युद्धविषयक चित्रपटातही आपण गाणी टाळू शकत नाही. कथानाट्य सादर करताना गाणी सादर करणे आणि कथा अर्थवाही करणे ही हजारो वर्षांची भारतीय कलापरंपरा आहे. ती रामलीला आणि कृष्णलीला ते अगदी चित्रपटांमध्येही दिसते. मात्र, सध्याच्या चित्रपटांमध्ये गाणी केवळ मागच्या बाजूला वाजताना दिसतात.
साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी असे गीतकार व शायर ऑस्कर आणि नोबेलचे दावेदार आहेत.' शब्दांचा जीव अल्पकाळ असतो; पण गायकांच्या आवाजामुळे तो चिरकाल टिकतो, असे सांगून अख्तर यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आठवणी जागवल्या. तसेच, त्यांनी भीमसेन जोशी यांनी जगाला आवाज दाखवला, असे सांगितले.
चित्रपट म्हटले की, हॉलिवूड म्हटले जायचे; पण आता भारतीय सिनेमा अधिक प्रगल्भ होत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुण्याविषयी अख्तर म्हणाले की, पुणे देशाला मार्ग दाखविणार्या विचारी लोकांचे आणि कलेचे शहर आहे. महाराष्ट्र हा नाट्य आणि कलासंस्कृतीचा प्रदेश आहे. महाराष्ट्राने देशाला चित्रपट दिला आहे. त्यामध्ये पुण्याचे प्रभात फिल्म कंपनीच्या माध्यमातून अमू्ल्य योगदान आहे. सिनेमाच्या विकासात पुण्याचा मोठा सहभाग आहे.
पं. देशपांडे म्हणाले, 'पंडित भीमसेन जोशी यांना जग हे 'भारताची ओळख' म्हणून जाणते आणि भारत त्यांना स्वतःचा अभिमान मानतो. पंडितजींनी कधीच फ्युजन केले नाही. त्यांचा स्वर हा नेहमीच आश्वासक होता.' यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंडित बिरजू महाराज यांना शर्वरी जमेनीस आणि सहकार्यांनी नृत्यांतून आदरांजली अर्पण केली. यशवंत जाधव यांनी पोवाडा आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांनी पारंपरिक गोंधळ सादर केला. डॉ. पटेल यांनी प्रास्ताविक केले. अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांनी निवेदन केले. उद्घाटननंतर स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांचा 'नेबर्स' चित्रपट दाखवण्यात आला.
चित्रपटाचा नायक आपल्यासाठी आदर्शवादी असतो. म्हणून चित्रपटात त्याचे काही एक स्थान ठरलेले असायचे. चित्रपटातील आताचा खलनायक कोणत्याही भूमिकेत असतो. अगदी तो पोलिसाच्या भूमिकेतही दिसतो. खलनायक आणि आपल्यात साम्य आढळत असल्याने सामान्य माणसालाही त्याचे वाईट वाटेनासे झाले आहे. समाजाचा चित्रपटावर काय परिमाण होतो याचा विचार कुणी करीत नाही.
– जावेद अख्तर, ज्येष्ठ गीतकार