नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी मनपा सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा प्रस्थापित व घराणेशाहीचा बोलबाला दिसून येणार आहे. याविरोधात शहरातील तरुण एकवटले असून, उमेदवारीसाठी तरुणांनी 'मिशन तरुण नाशिक' अभियानच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. तरुणांच्या उमेदवारीसाठी सर्व राजकीय पक्षांना साकडे घातले जाणार असल्याची माहिती मिशनचे मुख्य समन्वयक मुकेश गांगुर्डे यांनी दिली.
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मिशनचे समन्वयक संदीप मोरे, रुपेश परदेशी, अतुल मोहिते, कृष्णा शिलावट, रंजित बोधक, सुमित काळे आदी उपस्थित होते. तरुणांच्या हाती मनपाची सत्ता देऊन त्यांच्या कौशल्याच्या जोरावर नाशिकचा विकास साधण्यासाठी मिशन तरुण नाशिक अभियान सुरू करण्यात आल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.
निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांचे जिल्हाध्यक्ष व जिल्हाप्रमुख यांना निवेदन दिले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास मिशन तरुण नाशिकच्या माध्यमातून तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले जाणार असल्याचे गांगुर्डे यांनी स्पष्ट केले.
भावनिक मुद्द्यांना स्थान नको
दरम्यान, मद्य, पैसा, लोभाच्या गोष्टी आदी लोकशाहीला मारक असलेल्या बाबींना मिशनचा खुला विरोध आहे. निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढविली गेली पाहिजे. जात, धर्म, प्रांत आदी भावनिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान नको, अशी या मिशनमागील भूमिका असून, त्यासाठी जनजागृती केली जाणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.