स्मरणिका, हिशेब अन् ठाले-पाटील! ; नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या वादांचे कवित्व संपेना | पुढारी

स्मरणिका, हिशेब अन् ठाले-पाटील! ; नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या वादांचे कवित्व संपेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या 94 व्या मराठी साहित्य संमेलनाला तीन महिने उलटूनही वादांचे कवित्व संपत नसल्याची चिन्हे आहेत. संमेलनाची स्मरणिका अद्याप प्रसिद्ध होऊ शकलेली नाही, आयोजकांनी संमेलनाचा हिशेब जाहीर केलेला नाही, त्यातच आता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आयोजकांवर केलेल्या प्रहारांमुळे वादात भरच पडली आहे.

गेल्या 3 ते 5 डिसेंबरदरम्यान येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साहित्य संमेलन झाले. शहरापासून लांब असलेले संमेलनस्थळ, संमेलनाध्यक्षांची अनुपस्थिती, अखेरच्या दिवशी झालेली शाईफेक आदी कारणांमुळे हे संमेलन गाजले. मात्र, अद्यापही वाद थांबलेले नाहीत. संमेलनाची स्मरणिका अद्यापही प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. या स्मरणिकेचे काम सुरूच असल्याचे कळते. संपादक मंडळाने स्मरणिकेचे काम पूर्ण केले होते. मात्र, त्यात संमेलनातील कार्यक्रमांचा आढावा घेणारा मजकूरही समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर काम सुरू असल्याचे कळते. त्यामुळे ही स्मरणिका प्रसिद्ध होण्यास आणखी 15 ते 20 दिवस लागणार आहेत.

संमेलन काळातच झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी आपल्या संमेलनाचा संपूर्ण हिशेब जाहीर केला. मात्र, 94 व्या संमेलनाच्या आयोजकांना अद्यापही हिशेब सादर करणे शक्य झालेले नाही. त्यातच आता कौतिकराव ठाले-पाटील यांनी लेख लिहून संमेलनावर आसूड ओढले आहेत. नाशिकचे संमेलन सर्वसामान्य लोकांचे नव्हे, तर एकट्या छगन भुजबळ यांचे झाले. छोटेखानी संमेलनाऐवजी नाशिकच्या आयोजकांनी इव्हेंट, भपकेबाजीवर भर दिला. तीन जणांनी संमेलनाच्या नावाखाली आपला उद्देश साध्य करून घेतला, अशा शब्दांत ठाले-पाटील यांनी आरोप केले आहेत. या लेखामुळे संमेलन आयोजकांच्या अडचणींत भर पडली आहे.

साहित्य महामंडळाला विचारल्याशिवाय स्थानिक आयोजकांना काही करता येत नाही. संमेलनाची सर्व रचना व कार्यक्रम महामंडळाला विचारूनच झाले. शहरात संमेलनस्थळ मिळत नसल्याने लांब घ्यावे लागले. तरी लाखो लोकांनी हजेरी लावली. कोरोना काळातील संमेलन असूनही यशस्वी झाले. तीन लोकांनी संमेलन केल्याचा आरोप चुकीचा आहे. डॉ. नारळीकर यांनी आपण येणार नसल्याचे महामंडळाने ई-मेलने कळवले होते. त्याची कॉपी आमच्याकडे आहे.
– जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक, साहित्य संमेलन, नाशिक

हेही वाचा :

Back to top button