कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कठोर कारवाई करा | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कठोर कारवाई करा

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी प्रादेशिक कार्यालयाने अहवाल सादर केला आहे. त्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करा, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला बुधवारी दिले. पंचगंगा प्रदूषणाची गंभीर दखल घेत ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

पंचगंगा प्रदूषण गंभीर होत चालले आहे. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच पंचगंगेतील मासे मृत होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दि.25 फेब—ुवारीपासून गांधीनगर ते वळिवडे या दरम्यान सुर्वे बंधार्‍यानजीक पंचगंगेच्या पाण्यात मृत माशांचा अक्षरश: खच पडला होता. सुमारे अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक पात्रावर केवळ मृत मासे तरंगत होते. यामुळे नदीचे पात्रही दिसत नव्हते.

वळिवडेपासून पुढेही अनेक ठिकाणी पाणी प्रदूषित असल्याने गेल्या चार दिवसांपासून माशांची तडफड सुरू आहे. त्यातच मृत झालेले मासे पाण्यातच राहिल्याने ते कुजत आहेत. त्यामुळे नदीचे पाणी आणखी धोकादायक होत चालले आहे. यासर्व प्रकारामुळे वळिवडे पुढील नदीकाठावरील गावातील नागरिकांचे आणि जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

यासर्व पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे बैठकीत अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.

आराखडा सादर करण्याची सूचना

कोल्हापुरात भविष्याचा विचार करून अतिरिक्त सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसह ज्या नऊ गावांना क्लस्टर मंजूर झाला आहे, त्यासाठी निधी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांचा समावेश असणारा सर्वंकष आराखडा तयार करा आणि तो तत्काळ सादर करा, अशी सूचनाही ठाकरे यांनी यावेळी केली.

Back to top button