कोल्हापूर जिल्ह्यातील १६ मृत शेतकर्‍यांच्या वारसांना विमा धनादेशांचे वाटप | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील १६ मृत शेतकर्‍यांच्या वारसांना विमा धनादेशांचे वाटप

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सोळा मृत शेतकर्‍यांच्या वारसांना जिल्हा बँकेतर्फे 32 लाखांच्या विमा रकमेच्या धनादेशांचे वाटप संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

मुश्रीफ म्हणाले, शेतातील कामे करताना सर्पदंश, विजेचा धक्का, औषध फवारणी आदी कारणांमुळे तसेच अपघाताने शेतकर्‍यांचे दुर्दैवी मृत्यू होत असतात. त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लागावा म्हणून बँकेने ही विमा सुरक्षेची योजना सुरू केली. या विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकर्‍यांकडून न घेता बँकेच्या नफ्यातून भरण्यात येते.

बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत स्वभांडवलामधून अडीच लाख शेतकर्‍यांचा प्रत्येकी दोन लाखांचा विमा उतरविला होता. तसेच बँकेने सन 2021-2022 सालाकरिता इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्डधारक अडीच लाख शेतकर्‍यांचा प्रत्येकी दोन लाख विमासुरक्षेचा विमा उतरविला आहे. आतापर्यंत मृत शेतकर्‍यांच्या वारसांना दीड कोटीहून अधिक विमा रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

महादेव घाटगे, विठ्ठल तुपारे, प्रसाद पाटील, अनुसया पवार, रामचंद्र पाटील, सोमनाथ पाटील, तुकाराम निंबाळकर, एकनाथ पाटील, ज्ञानू पाटील, बापुसाो जाधव, सचिन पाटील, वसंत कुपले, गणपती ताकमारे, बाजीराव पाटील यांच्या वारसांना धनादेश देण्यात आले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

Back to top button