‘पंचगंगे’त मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर | पुढारी

‘पंचगंगे’त मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर

कोल्हापूर ; आशिष शिंदे : कचरा, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रांमधील रासायनिक पाणी थेट नदीपात्रामध्ये सोडले जात असल्याने पंचगंगा नदी अक्षरश: प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्याचवेळी काही लोक मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करत असल्याने नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने केलेली मासेमारी खवय्यांच्या आरोग्याच्या द‍ृष्टीने धोकादायक आहे.

झटपट मासेमारी करण्यासाठी नदीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून मासेमारी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. काही लोक सायंकाळी मासे मारण्यासाठी येतात. त्यावेळी ते जाळे लावण्याआधी ब्लिचिंग पावडर पाण्यात टाकत असल्याचे नदीकाठच्या शेतकर्‍यांनी सांगितले; तर नदीत पावडर टाकून मासे मारले जात असल्याचे रंकाळा तलावामध्ये मासेमारी करणार्‍या काहींनी सांगितले. काही लोकांकडून होत असलेल्या ब्लिचिंग पावडरच्या वापराचा फटका पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे.

ब्लिचिंग पावडर वापरून मारलेले मासे खाणे मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या मृत माशांसोबत ब्लिचिंग पावडर थेट मानवी शरीरात प्रवेश करते. यामुळे आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

…अशी केली जाते मासेमारी

गळ लावून मासेमारी करणारे लोक पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकतात. यानंतर ते पाण्यात गळ टाकतात. काहीजण माशांसाठी गळाला लावण्यात येणार्‍या खाद्याला ब्लिचिंग पावडरमध्ये भिजवून पाण्यात टाकतात, तर काहीजण ब्लिचिंग पावडर टाकतात यानंतर जाळे लावतात. यामुळे मोठ्या प्रमाणात मासे सापडतात.

पाणी शुद्धीकरणासाठी वापर

ब्लिचिंग पावडर म्हणजे कॅल्शियम हायपोक्लोराईट. याचा वापर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आणि ब्लिचिंग एजंट म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिण्याचे पाणी किंवा स्विमिंग पूलच्या पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी याचा वापर केला जाते.

जलचरांचे अस्तित्व धोक्यात

पंचगंगा नदीपात्रात ब्लिचिंग पावडरच्या वापरामुळे मासे, साप, बेडूक व इतर जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पावडरच्या वापरामुळे केवळ माशांचाच नव्हे, तर कॅट स्नेक, बेडूक तसेच इतर जलचरांचाही मृत्यू होतो.

पाण्यातील ऑक्सिजन होतो कमी

जेव्हा पाण्याचा प्रवाह मंद असतो आणि पाण्याची पातळी कमी असते अशावेळी ब्लिचिंग पावडर मासेमारीसाठी खूप प्रभावी ठरते. ब्लिचिंग पावडर पाण्यात टाकल्याने पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन (डीओ) कमी होतो. पावडर टाकलेल्या भागात ऑक्सिजनअभावी मासे तडफडून जाळ्यात सापडतात. पावडरचे प्रमाण वाढते आणि पावडर पसरते तेव्हा नदीपात्रात मृत माशांचा खच दिसून येतो.

Back to top button