दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 8 पट वाढ | पुढारी

दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 8 पट वाढ

मुंबई ; चेतन ननावरे : पेट्रोल व डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने राज्यातील ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे मोर्चा वळविल्याने गेल्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 8 पटींनी वाढली आहे. नव्या वर्षातही कार खरेदी करणार्‍या ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वाढतच आहे.

परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारी महिन्यात तब्बल 5 हजार 741 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. याउलट दोन वर्षांपूर्वी कोरोना येण्याआधी 2020 मध्ये हाच आकडा 739 वाहनांइतका मर्यादित होता. 2021 मधील जानेवारीच्या तुलनेत 2022 मधील जानेवारी महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उलाढालीत तब्बल पाचपट वाढ नोंदविण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यातही हा चढता आलेख कायम आहे. या महिन्यातील अवघ्या आठवडाभरातच 1 हजार 982 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली आहे. राज्यात 2022 मध्ये आतापर्यंत एकूण 7 हजार 723 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2020 मध्ये

इलेक्ट्रिक वाहन विक्रीचे प्रमाण एक टक्क्याहून कमी होते, ते 2022 मध्ये 3.19 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. शिवाय नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी जाहीर करण्यात आल्याने 2022 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवाय सीएनजी वाहनांपेक्षा ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.

सीएनजीपेक्षा अधिक पसंती इलेक्ट्रिकला

राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांचा आकडा हा सीएनजी वाहनांहून अधिक झाला आहे. राज्यात एकूण वाहनांची संख्या 3 कोटी 10 लाख 51 हजार 130 इतकी आहे. त्यात एकूण सीएनजी वाहनांची संख्या 66 हजार 362 आहे. याउलट गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने एकूण इलेक्ट्रिक वाहनांचा आकडा 66 हजार 543 झाला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते

प्रमाण खालीलप्रमाणे

महिना वाहन विक्री (टक्‍का)
जानेवारी 2020 0.34
जानेवारी 2021 0.55
जानेवारी 2022 2.90
फेब्रुवारी 2022 4.53

Back to top button