कोरोना संघर्षात भारताची कामगिरी अव्वल! | पुढारी

कोरोना संघर्षात भारताची कामगिरी अव्वल!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी गलेलठ्ठ दरडोई उत्पन्‍न, अत्याधुनिक साधन-सुविधांची विपुलता आणि मनुष्यबळाची फौज एवढ्या बाबी पुरेशा नाहीत. त्यासाठी कणखर नेतृत्व, योग्य निर्णयक्षमता यांची नितांत आवश्यकता असते, याचा अस्सल पुरावा जगाच्या कोरोना प्रगतिपुस्तकाच्या रूपाने पुढे आला आहे. दोन वर्षांपूर्वी जगाला हादरवून सोडणार्‍या कोरोना महामारीविरुद्ध केलेल्या संघर्षामध्ये भारताने अव्वल कामगिरी बजावल्याची आकडेवारी या प्रगतिपुस्तकाने स्पष्ट केली.

चीन व्हाया ब्राझील जगभरात पसरलेल्या कोरोनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांमध्ये जगातील कोरोेनाबाधित रुग्णसंख्येने शुक्रवारी 38 कोटी 65 लाख 48 हजार 962 अशी नोंद केली, तर या रोगाने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या 57 लाख 5 हजार 754 इतकी झाली. या प्रगतिपुस्तकात जगात लोकसंख्येचा विस्फोट म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताची तुलनात्मक स्थिती मात्र बरीच वरचढ आहे.

भारताने दरडोई उत्पन्‍न, साधन-सुविधांची विपुलता, शिक्षित मनुष्यबळाची फौज आणि भारताच्या 30 टक्के लोकसंख्या अशी मोठी जमेची बाजू असणार्‍या अमेरिकेलाही लाजविले आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णसंख्या भारताच्या दुपटीजवळ म्हणजे 7 कोटी 62 लाखांवर पोहोचली. कोरोना मृत्यूंचे प्रमाणही भारतातील कोरोना मृत्यूंच्या दुपटीजवळ म्हणजे 9 लाखांवर गेले. शिवाय, दर 10 लाख लोकसंख्येमागे असलेल्या कोरोना मृत्यूंच्या प्रमाणात अमेरिकेतील कोरोना मृत्यू भारताच्या आठ पटीहून अधिक आहेत. या आकडेवारीने जगाच्या महासत्तेलाही लाजविले आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या यादीमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. शुक्रवारी भारतातील कोरोना मृत्यूंच्या संख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तरीही कोरोना मृत्यूंच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत 15 टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राझीलमध्ये कोरोना मृत्यू 6 लाख 30 हजारांवर गेले आहेत आणि तेथील दर 10 लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे 2 हजार 931 आणि मृत्यूदर 2.41 वर आहे. 2020 मध्ये अमेरिका व ब्राझीलचे दरडोई उत्पन्‍न अनुक्रमे 63 हजार 543 डॉलर्स व 6 हजार 796 डॉलर्स इतके होते आणि भारताचे दरडोई उत्पन्‍न अवघे 1900 डॉलर्स इतके होते.

शिवाय, भारतात महानगरपालिकडे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची आबाळ होती आणि दर हजारी डॉक्टरांचे प्रमाणही अत्यल्प होते. या अत्यंत टोकाच्या स्थितीतही भारताने कोरोना मृत्यू रोखलेच, संसर्गावर नियंत्रण आणले आणि देशातील 95 टक्के प्रौढांना लसीचा पहिला, तर 75 टक्के प्रौढांना दुसरा डोस देण्याचीही कामगिरी बजावली. यामुळेच भारताने आर्थिक महासत्तेलाही आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.

Back to top button