BUDGET 2022 : रेल्वे, इंटरसिटी एक्स्प्रेससह इको टुरिझमला मिळावे पाठबळ | पुढारी

BUDGET 2022 : रेल्वे, इंटरसिटी एक्स्प्रेससह इको टुरिझमला मिळावे पाठबळ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा पाठपुरावा, कोल्हापूर-मिरज रेल्वेलाईनचे दुहेरीकरण तसेच कोल्हापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, इको टुरिझम आणि कल्चरल टुरिझम संकल्पना राबवाव्यात अशा मागण्या कोल्हापूरच्या खासदारांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत. मंगळवारी जाहीर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात (BUDGET 2022) किती योजनांना स्थान मिळते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कोल्हापूर-वैभववाडी हा कोकण रेल्वेला जोडणारा मार्ग सुरू करण्यासाठी अनेकवेळा घोषणा झाल्या. मात्र त्याकडे पूर्ण ताकदीने पाहिले नाही. या मार्गासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी कोल्हापुरातून सुटणार्‍या सर्व रेल्वे पूर्ववत सुरू कराव्यात. कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करावे, कोल्हापूर-पुणे इंटरसिटी सुरू करावी, बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे,

कोल्हापुरातून हावडा, कन्याकुमारी, जम्मू तावी, जयपूर, विशाखापट्टणम, हैदराबाद (व्हाया सोलापूर), तिरुअनंतपूरम, वाराणसी, मेंगलोर, गोवा रेल्वे सुरू कराव्यात. कोल्हापूर-दिल्‍ली-कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेस दररोज सुरू करावी, मिरज-बंगळूर चन्‍नमा एक्स्प्रेस कोल्हापुरातून सुरू करावी आदी मागण्याही केल्या आहेत.

डोंगरी भागाच्या विकासासाठी या भागातील औषधी वनस्पतींचा विचार करून इको टुरिझम व कल्चरल टुरिझम संकल्पना राबवाव्यात, अशा मागण्या धैर्यशील माने यांनी केंद्र सरकारकडे केल्या आहेत.

गेले काही वर्षे कोल्हापूर व सांगलीला वादळी वारे आणि महापुराचा तडाखा बसला आहे. त्यासाठी उपाययोजना आखण्यात यावी, हातकणंगले-इचलकरंजी रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला. 160 कोटी रुपये या योजनेचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. या मार्गाला आर्थिक तरतूद करावी, इचलकरंजीला टेक्स्टाईल व फूड पार्क सुरू करावा आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.

व्यापार, आयटी, बांधकाम क्षेत्राला चालना द्यावी (BUDGET 2022)

आयकर सूट मर्यादा वाढवणे, इंधनावरील कर कमी करणे तसेच जीएसटीमध्ये सुटसुटीतपणा आणावा अशी अपेक्षा केंद्रीय अर्थसंकल्पाकडून केली जात आहे. कोरोना काळात ऑनलाईन व्यवहाराला चालना मिळाली आहे. त्यात आणखी सुटसुटीतपणा आणण्याची अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

इंधनाच्या वाढत्या किमती पाहता ई-बाईक्स तसेच ई-व्हेईकलची मागणी वाढत आहे. पण अजून या वाहनांचे उत्पादन, त्यांच्या किमती, बॅटरी चार्जींग स्टेशन बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

आयटी उद्योग क्षेत्राला देखील अर्थसंकल्पाकडून (BUDGET 2022) बर्‍याच अपेक्षा आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट्सवरील जीएसटी कमी करणे, कंपोनंटस् ड्युटीजमध्ये आणखी वाढ न करणे, आयात शुल्कात कपातीची मागणी होत आहे. वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

गृहकर्जाला चालना देण्यासाठी बँकांच्या गृहप्रकल्पांना अल्प दरात कर्ज उपलब्ध झाल्यास बांधकाम क्षेत्राला चालना मिळू शकते, असे बांधकाम व्यवसायिक जयेश ओसवाल यांनी सांगितले. सराफ व्यवसायासाठी जीएसटीचा टप्पा कमी करावा, पूर्वी व्हॅट 1 टक्‍का होता. पण जीएसटी 3 टक्के आहे. हा जीएसटी कमी करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे भरत ओसवाल यांनी सांगितले.

कोरोना काळात किरकोळ व्यापार्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यांना उभारी देण्यासाठी व्यापार्‍यांना अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने योजना जाहीर करणे गरजेचे आहे असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

Back to top button