शेती वीजपुरवठ्याच्या रात्रीच्या वेळापत्रकात बदल | पुढारी

शेती वीजपुरवठ्याच्या रात्रीच्या वेळापत्रकात बदल

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण 1 व ग्रामीण 2 या विभागातील शेती वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या भागातील शेतकर्‍यांनी शेतीला पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी केली होती. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर महावितरणकडून शेती वीजपुरवठ्याचे वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण 1 विभागात पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, करवीर, तर कोल्हापूर ग्रामीण 2 विभागात राधानगरी, कागल, भुदरगड या तालुक्यांचा समावेश होतो. महावितरणकडून या भागातील शेतीच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.

मात्र, रात्रीच्या वेळी नागरीवस्तीसह शेतभागात वन्यप्राण्यांच्या वावर वाढल्याने शेतीच्या वेळापत्रकात बदल व्हावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती. ही मागणी महावितरण मुख्यालयाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.

कोल्हापूर ग्रामीण 1 विभागात रात्री 1.15 ते सकाळी 9.15 वाजेपर्यंत ऐवजी आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या वेळेत शेती वाहिनीवर वीजपुरवठा केला जाईल. कोल्हापूर ग्रामीण 2 विभागात रात्री 1 ते सकाळी 9 वाजेपर्यंत याऐवजी आता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत तर दिवसाचा सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंतऐवजी सकाळी 8.40 ते 4.40 वाजेपर्यंत या वेळेत शेती वाहिनीवर वीजपुरवठा केला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

असा होईल वीजपुरवठा

कोल्हापूर ग्रामीण 1 : रात्री 10 ते सकाळी 6

कोल्हापूर ग्रामीण 2 : रात्री 9 ते सकाळी 5

दिवसा : सकाळी 8.40 ते दुपारी 4.40 .

Back to top button