गवे पुन्हा परतले सादळे घाट परिसरात | पुढारी

गवे पुन्हा परतले सादळे घाट परिसरात

कासारवाडी ; पुढारी वृतसेवा : शनिवारी सायंकाळी मादळे (ता. करवीर) येथील चार बंगले परिसरातून पोहाळेच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या तीन गव्यांचा कळप रविवारी सकाळी कासारवाडी, सादळे येथील पहिल्या घाटात नागरिकांच्या निदर्शनास आला. आता पुन्हा गवे कासारवाडी, सादळे परिसरात वावरू लागले आहेत.

मागील काही दिवसांपासून अंबप, मनपाडळे, पाडळी येथील शेतवडीतून तीन गव्यांचा कळप शनिवारी मादळे परिसरातून पोहाळेच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे नागरिकांनी पाहिले होते. यामुळे नागरिकांसह वनविभागाला दिलासा मिळाला होता. पोहाळेच्या दिशेने गेलेले गवे गिरोली, जोतिबामार्गे पन्हाळ्याकडे आपल्या नैसर्गिक अधिवासात मार्गक्रमण करतील, असा वन विभागाचा अंदाज होता.

पण रविवारी सकाळी सातच्या सुमारास कासारवाडी, सादळे घाटात गवे घुटमळताना नागरिकांच्या निदर्शनास आलेे. शेतमजूर सकाळी गवत कापण्यासाठी जंगलात जात होते. यातील अनेक नागरिकांना गव्यांचा कळप निदर्शनास आला आणि शेतात गेलेल्या शेतमजुरांत घाबरट पसरली व शेतमजूर परत फिरले.

गवे घुटमळणारा व्हिडीओ सोशल मीडियावर वार्‍यासारखा पसरला आणि कासारवाडी, सादळेे-मादळे नागरिकांंच्यात घबराट पसरली. वन विभागाचे वाहन मात्र नेहमीप्रमाणेच रस्त्याने फिरून परत गेले. रविवार असल्याने घाटात पर्यटकांची वर्दळ होती. मात्र याकडे वन आणि पोलिस फिरकले नाहीत. रविवारी दिवसभर गवे मनपाडळेे, सादळेे-मादळेे, कासारवाडी परिसरात वावरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत होते.

रविवार असल्याने कासारवाडी, सादळे-मादळे रस्त्याला जोतिबा – पन्हाळ्याला जाणार्‍या पर्यटकांची वर्दळ होती. अनेक पर्यटक कुटुंबे घाटात थांबून नेहमीप्रमाणे सेल्फी घेत होते. सकाळी या घाटात गवे असल्याने दिवसभर नागरिक गवे पाहण्यासाठी गर्दी करत होते. सायंकाळी वन विभागाच्या वतीने डॉक्टर आले आणि निघून गेले.

Back to top button