विनायक राऊत यांच्या विरोधात राणे की सामंत? | पुढारी

विनायक राऊत यांच्या विरोधात राणे की सामंत?

गणेश जेठे

महायुतीतील भाजपने ज्या 20 जागांवरील उमेदवार जाहीर केले असले तरी वादग्रस्त ठरलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून नेमका कुणाचा आणि कोण उमेदवार असेल हे अद्याप तरी निश्चित झालेले नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे की शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण सामंत उमेदवार असतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विनायक राऊत यांचा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन प्रचार सुरू झाला आहे. मात्र, त्यांच्या विरोधात उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीत कोणाला मिळावी, यावरून राणे आणि सामंत यांच्यामध्ये सुरुवातीपासून वाद सुरू आहे. मध्यंतरी इच्छुक उमेदवार किरण सामंत यांचे बंधू उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राणे यांची भेट घेतल्याची माहिती होती. त्याशिवाय परवा रत्नागिरीत झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यात किरण सामंत हे हिरिरीने सहभागी झाले होते. त्यामुळे किरण सामंत यांना उमेदवार मिळणार, असे निश्चित मानले जात आहे. भाजपने आपल्या धोरणानुसार किरण सामंत यांना कमळ ही निशाणी घेऊन निवडणूक लढवावी, अशी म्हणे गळ घातली होती. मात्र, किरण सामंत यांनी कमळ या निशाणीपेक्षा शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढविण्यावर ठाम मत व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. चार महिन्यांपूर्वी किरण सामंत यांनी मशाल हे चिन्ह व्हॉटस्अ‍ॅपच्या स्टेटसवर ठेवून धमाल उडवून दिली होती. त्यामुळे किरण सामंत हे या निवडणुकीत मशाल या चिन्हाबाबत काही भूमिका घेतील का, असाही एक प्रश्न अधूनमधून उपस्थित केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची जोरदार तयारी ठेवली आहे.

भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून ही जागा भाजपला मिळावी आणि तिथे केंद्रीय मंत्री राणे यांना उमेदवार म्हणून उभे करावे, अशी मागणी होत आहे. परंतु आपण इथे निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही, असे राणे यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधूनमधून विद्यमान सिंधुदुर्गचे पालकमंत्री, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे येत असते. उमेदवारी देताना ऐनवेळी धक्कातंत्राचाही वापर केला जाईल, असे काही भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते. एका बाजूने ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते राऊत यांच्या प्रचाराला जुंपले असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अद्यापही गोंधळाचीच स्थिती आहे.

तळकोकण हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना या दोन्हींकडून आपणच जिंकणार असल्याचे दावे केले जात आहेत. विनायक राऊत हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. दोन्ही वेळी त्यांनी नीलेश राणे यांचा पराभव केला आहे. त्यातील एकवेळा नीलेश राणे हे काँग्रेसमधून तर दुसर्‍या वेळा त्यांच्या स्वाभिमान या पक्षातून निवडणूक लढले होते. 2009 च्या निवडणुकीत नीलेश राणे काँग्रेसमधून विजयी झाले होते.

गेल्या 2019 सालच्या निवडणुकीत विनायक राऊत हे 1 लाख 78 हजार 322 एवढे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. तेव्हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 2019 मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना 1 लाख 01 हजार 259 तर नीलेश राणे यांना 41 हजार 700 इतकी मते मिळाली होती. चिपळूण विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना 87 हजार 630 तर नीलेश राणे यांना 30 हजार 397 इतकी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात राऊत यांना 71 हजार 799 तर नीलेश राणे यांना 38 हजार 144 इतकी मते मिळाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्यापेक्षा नीलेश राणे यांना अधिकची मते मिळाली होती. नीलेश राणे यांना 67 हजार 824 तर विनायक राऊत यांना 57 हजार 93 इतकी मते मिळाली होती. कुडाळ विधानसभा मतदारसंघात राऊत यांना 63 हजार 909 तर नीलेश राणे यांना 54 हजार 750 आणि सावंतवाडी मतदारसंघात राऊत यांना 74 हजार 224 तर नीलेश राणे यांना 44 हजार 845 इतकी मते मिळाली होती. काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर हे त्यावेळी रिंगणात होते. त्यांना एकूण 60 हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. तेव्हा मोदी लाट होती. आताची परिस्थिती थोडी बदलली आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते यावर या मतदारसंघातील निकालाची गणिते अवलंबून आहेत.

Back to top button