रत्‍नागिरी : कुख्यात डॉन दाऊदची मालमत्‍ता सरकारकडून खरेदी केलेल्या भुपेंद्र कुमार भारद्वाज यांना धमक्या | पुढारी

रत्‍नागिरी : कुख्यात डॉन दाऊदची मालमत्‍ता सरकारकडून खरेदी केलेल्या भुपेंद्र कुमार भारद्वाज यांना धमक्या

खेड शहर : पुढारी वृत्तसेवा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे मुळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील मुंबके गावातील मालमत्‍ता सरकारी लिलावामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी खरेदी केली आहे. त्या जागेत होम हवन करताना वापरण्यात आलेल्या वस्तूंची अज्ञाताने चोरी केली. या प्रकरणी आज खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याची रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील मुंबके या मूळ गावात मालमत्ता होती. ती दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी साफेमा अंतर्गत झालेल्या लिलावात खरेदी केली होती. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2024 रोजी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरित झाले. त्यानंतर त्याच दिवशी मुंबके येथे जाऊन वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी सनातन धर्मानुसार होम हवन करायला सुरुवात केली. त्यावेळी संध्याकाळ झाल्यामुळे त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा होम हवन करण्यासाठी त्या ठिकाणी सकाळी भारद्वाज गेले असता, त्या ठिकाणी ठेवलेले धार्मिक पुस्तके, पूजेचे साहित्य तसेच घरगुती वस्तू व सांस्कृतिक मालमत्ता चोरीला गेल्‍याचे त्‍यांच्या निदर्शनास आले. त्यामध्ये समई, हवन कुंड, स्टीलचे ताटे अशाप्रकारे नऊ हजार चारशे रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे. काल 26 मार्च 2024 रोजी खेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम कासकर यांची भारत सरकारने साफेमा अंतर्गत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी दाऊदच्या मुंबके या मूळ गावातली मालमत्ता घेतली. दोन महिन्यापूर्वी ही मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित देखील झाली. 2020 ते 2024 या दरम्यान वेळोवेळी ही प्रक्रिया चालू असताना मुंबके या गावात माझं येणं जाणं असलं तरी स्थानिक लोकांकडून मला जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button