Lok Sabha Election 2024 : निवडणुकांतील जायंट किलर्स | पुढारी

Lok Sabha Election 2024 : निवडणुकांतील जायंट किलर्स

देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अठरावी लोकसभा जिंकण्यासाठी पक्षांसह राजकारणातील दिग्गज रणामध्ये उतरले आहेत. गेल्या सात दशकांत 17 लोकसभा निवडणुका झाल्या. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या सर्वच निवडणुका खास ठरल्याच. मात्र, गेल्या 75 वर्षांमध्ये राजकारणातील अपराजित अशी इमेज असणार्‍या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, स. का. पाटील, मिनू मसानी, राहुल गांधी, सोमनाथ चॅटर्जी यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना अस्मान दाखवणारे जायंट किलर्स केंद्रबिंदू ठरले आहेत.

भारतीय राजकारणाच्या इतिहासात खर्‍या अर्थाने निर्विवादपणे सर्वात मोठे जायंट किलर कोण असतील तर ते म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभव करणारे ‘राज नारायण’. आणीबाणीनंतर लागलेली 1977 सालची लोकसभा निवडणूक सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक मानली जाते. या निवडणुकीत पुन्हा इंदिरा गांधी यांच्या विरोधात उभारण्याचा निर्धार राज नारायण यांनी तुरुंगातच केला होता. कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते की इंदिरा गांधी यांचा पराभव होईल. मात्र, राज नारायण यांनी गांधी यांच्या होम ग्राऊंड असलेल्या रायबरेली मतदार संघातच 55 हजार मतांची आघाडी घेत गांधी यांना धूळ चारली होती. यामुळे राज नारायण यांना राजकारणातील सर्वात मोठे जायंट किलर म्हणून ओळखले जाते.

स. का. पाटील

मुंबईचे अनभिषिक्त सम—ाट असणारे काँग्रेसचे बलाढ्य नेते सदाशिव कानोजी पाटील अर्थात स. का. पाटील यांचे महत्त्व लक्षात घेऊन पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री व इंदिरा गांधी यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात संधी दिली होती. ते 1952 ते 67 या काळात दक्षिण मुंबईचे ते खासदार होते. स. का. पाटलांचा पराभव होईल, अशी कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. मात्र, 1962 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोशालिस्ट पक्षाकडून निवडून आलेल्या मुत्सद्दी राजकारणी असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी 1967 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदार संघातून स. का. पाटलांना अस्मान दाखवले होते. अपराजित अशा स. का. पाटलांचा त्यांनी 29 हजार मतांनी पराभव केला होता आणि जॉर्ज फर्नांडिस जायंट किलर ठरले होते.

मिनू मसानी

स्वातंत्र्य पार्टीचे नेते आणि तत्कालीन समाजवादाच्या विरोधात आवाज उठवणारे मिनू मसानी यांना 1971 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसच्या घनश्यामभाई ओझा यांनी त्यांचा 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

पी. व्ही. नरसिंहराव

भाजपने 1984 मध्ये फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी हणमकोंडाची एका जागा जिंकली होती, चंदूपातला जंगा रेड्डी यांनी. त्यांनी काँग्रेस नेते पी. व्ही. नरसिंहराव यांचा सुमारे 54 हजार मतांनी पराभव केला होता.

एच. डी. देवेगौडा

माजी पंतप्रधान देवेगौडा यांना 2004 मध्ये पराभवाचा धक्का बसला होता. काँग्रेसच्या तेजस्विनी सी रमेश यांनी कनकपुरा मतदार संघातून त्यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता.

अरुण जेटली

मोदी लाटेतही त्यांचे जवळचे सहकारी असलेल्या अरुण जेटली यांचा 2014 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांचा एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला होता.

राहुल गांधी

गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. इराणी यांनी 55 हजार मतांचे लीड घेत गांधींना पराभवाची धूळ चारली होती.

सोमनाथ चॅटर्जी

कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते म्हणून ओळख असणार्‍या सोमनाथ चॅटर्जी यांचा 1984 च्या निवडणुकीत जादवपूरमधून पराभव झाला होता. काँग्रेसच्या बंगाल युनिटच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी त्यांना धूळ चारली होती. बंगालमध्ये ममता कम्युनिस्टांना पराभूत करतील, असे कोणाला वाटलेही नव्हते.

सीके जाफर शरीफ

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सीके जाफर शरीफ यांचा पहिलीच निवडणूक लढवत असणार्‍या डॉ. एचटी सांगलियाना यांनी 2004 साली पराभव केला होता.

अटल बिहारी वाजपेयी

लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. 1984 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना देखील पराभवाचा सामाना करावा लागला होता. ग्वाल्हेरमधून माधवराव शिंदे यांनी सुमारे दोन लाख मतांच्या फरकाने वाजपेयी यांना धूळ चारली होती.

Back to top button