Shantigiri Maharaj : उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढू, शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम | पुढारी

Shantigiri Maharaj : उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढू, शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप कोणाचेही नाव अधिकृत झाले नसले तरी महायुतीमधील तीनही पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे. यामध्ये आता शांतिगिरी महाराज यांनी आता निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी जरी मिळाली नाही तरी आपण अपक्ष लढू, असेदेखील शांतिगिरी महाराजांनी म्हटले आहे. शांतिगिरी महाराजांच्या (Shantigiri Maharaj) या पावित्र्याने आता नवा ट्विस्ट नाशिक मतदारसंघात येणार आहे.

शांतिगिरी महाराजांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वत:चे जवळपास दीड लाखाहून अधिक भक्तपरिवाराचे मतदान आहे. तसेच आतापर्यंत इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यामध्ये महाराजांनी वैयक्तिक भेटी घेतल्या आहेत. यामध्ये आता फक्त नाशिक शहर बाकी असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटदेखील घेतली होती. मात्र, शिवसेनेच्या मेळाव्यातून श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसेच उमेदवार असतील, अशी घोषणा केल्याने शांतीगिरी महाराजांचा पत्ता कट झाला असून, ते माघार घेतील अशी चर्चा होती. मात्र, आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी म्हटले आहेत.

गेल्या आठवड्यात महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शांतिगिरी महाराज यांच्याकडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हालाचली सुरू झाल्या होत्या. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत शांतिगिरी महाराजांच्या भक्तपरिवाराची चर्चादेखील झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

Back to top button