Nilesh Rane vs Bhaskar Jadhav : राणे-जाधव समर्थकांत राडा | पुढारी

Nilesh Rane vs Bhaskar Jadhav : राणे-जाधव समर्थकांत राडा

चिपळूण, सुनील दाभोळे : गेले आठ दिवस आमदार भास्कर जाधव आणि माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane vs Bhaskar Jadhav) यांच्यात सुरू असलेल्या राजकीय वादाचा अखेर चिपळुणात स्फोट झाला. शुक्रवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नीलेश राणे चिपळूणमधील विश्रामगृहावरून गुहागरकडे सभास्थळी जाताना भाजप व शिवसेना ‘उबाठा’ या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी व अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू झाली. अखेर आक्रमक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी वाढताच एकमेकांना आव्हान देण्यास सुरुवात झाली. त्यातच दगडफेकीला सुरुवात झाली.

मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूकडून दगडफेक सुरू झाल्यावर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात भिडण्याच्या तयारीला लागले. दगडफेक व दोन्ही बाजूच्या आक्रमक कार्यकर्त्यांना रोखण्यात पोलिसांची दमछाक झाली. दगडफेकीमध्ये अनेक पोलिस जखमी झाले तर राणे समर्थकांमध्ये देखील अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. राणे समर्थकांची अनेक वाहने दगडफेकीत फुटली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत अश्रुधूराच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज केल्याने पळापळ झाली. (Nilesh Rane vs Bhaskar Jadhav)

गेले काही दिवस राणे कुटुंबीय आणि आ. भास्कर जाधव यांच्यात राजकीय वाक्युद्ध सुरू होते. त्यातून मोठ्या प्रमाणात एकमेकांची उणीदुणी काढण्यासहीत एकमेकांना आव्हान देण्याची भाषादेखील सुरू होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांचा हिशोब चुकता करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार शुक्रवारी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे माजी खा. राणे यांची जाहीर सभा आयोजित केली होती.

या सभेला जाण्यासाठी त्यांचे चिपळुणात दुपारी आगमन झाले. यावेळी ते काही काळ शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी थांबले. दुसरीकडे दुपारी 2 वाजल्यापासून उबाठा सेनेचे कार्यकर्ते व आ. भास्कर जाधव समर्थक मोठ्या प्रमाणात आ. जाधव यांच्या संपर्क कार्यालयात जमा झाले. यावेळी स्वत: आ. जाधव हे देखील समर्थकांसोबत घोषणाबाजीत सहभागी झाले. दुपारी 2 नंतर समर्थकांनी आ. जाधव यांच्या कार्यालयानजिक हजारोंच्या संख्येने गर्दी केली. यावेळी चिपळूण पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला. तर आ. जाधव यांच्या कार्यालयाकडे जाणारा मार्गही बंद करण्यात आला.

दुसरीकडे शासकीय विश्रामगृहावर माजी खा. निलेश राणे हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते तर आ. जाधव यांच्या कार्यालयासमोरील महामार्गाच्या दुसर्‍या लेनमध्ये निलेश राणे यांच्या आगमनानंतर स्वागतासाठी ढोल-ताशा पथक तैनात होते. त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने राणे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. सायंकाळी 4 नंतर हळूहळू आ. जाधव समर्थकांकडून आक्रमक व जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. त्याचवेळी महामार्गाच्या दुसर्‍या लेनमध्ये भाजप कार्यकर्ते व राणे समर्थकांकडूनही जोरदार घोषणाबाजी आक्रमकपणे सुरू झाली. परिणामी, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना आव्हान देण्यात आले. दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते एकमेकांना आव्हान देत भिडण्याच्या तयारीला लागले. वातावरण बिघडत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी बळाचा वापर सुरू केला.

आक्रमक कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि आव्हानाची भाषा सुरू असतानाच अचानकपणे महामार्गावर दगडफेकीला सुरुवात झाली. दगडफेक सुरू होताच जमावातील काहीजणांची पळापळ सुरू झाली. दोन्ही गटातील अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांवर अक्षरश: दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडाच्या वर्षावातच दोन्ही बाजूकडील आक्रमक कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करू लागले. वातावरण चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडांचा भडीमार वाढल्यावर पोलिसांनी अखेर नाईलाज म्हणून अश्रुधुराची नळकांडी फोडली तसेच लाठीचार्जदेखील केला.

दगडफेक व पळापळीच्या घटनेनंतर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे राणे समर्थकांच्या वाहनांचा ताफा शृंगारतळीकडे सभास्थळी पुढे सरकला तर आ. जाधव समर्थक भाजप कार्यकर्त्यांचा पाठलाग करण्यासाठी महामार्गावर धावून येऊ लागले. मात्र, पोलिसांनी पुन्हा एकदा आक्रमक कार्यकर्त्यांना रोखले. राणे यांचा ताफा गेल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत आ. जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात समर्थक होते. त्यामुळे चिपळुणातील वातावरण तप्त झाले आहे.

पोलिस कर्मचार्‍यांसह कार्यकर्तेही जखमी…

दगडांच्या वर्षावात पाच ते सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले. राणे समर्थकांतील अनेक कार्यकर्तेदेखील गंभीर जखमी झाले. महामार्गावरील राणे समर्थकांची वाहने व काचा दगडांच्या वर्षावाने फुटल्या. एकूणच दुपारी 4.30 नंतर राणे समर्थक आणि जाधव समर्थक यांच्यामधील आक्रमकपणा वाढत गेला आणि सायंकाळी 5 नंतर राणे सभास्थळी जाण्यासाठी निघाले असता आक्रमक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाली.

Back to top button