Ratnagiri News : मेढे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान | पुढारी

Ratnagiri News : मेढे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

साडवली: पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगुस येथील सुभाष दत्ताराम देसाई यांच्या राहत्या घरासमोरील विहिरीमध्ये बिबट्या पडला. ही घटना आज (दि.१४) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. या बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टिमने पिंजऱ्याच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढून जीवदान दिले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. Ratnagiri News

याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेढे तर्फे फुणगुस येथे विहिरीत बिबट्या पडल्याची खबर पोलिस पाटील दीपक सावंत यांनी संगमेश्वरचे (देवरुख) वनपाल तौफीक मुल्ला यांना दिली. त्यानंतर वनपाल तौफीक मुल्ला यांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी विहिरीत बिबट्या दगडाचा आधार घेऊन बसलेला दिसला. Ratnagiri News

त्यांनतर ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीमध्ये सोडल्यांनतर बिबट्याला पिजऱ्यामध्ये जेरबंद केले. ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरी बाहेर काढण्यात आला. देवरुखचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंदराव कदम यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या अंदाजे ३ वर्षाचा असून तो नर जातीचा आहे. तपासणी वेळी बिबट्याच्या अंगावर ताजी अगर जुनी जखम दिसून आली नाही. त्यामुळे सुस्थितीत असल्याने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तौफीक मुल्ला यांनी हा बिबट्या भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तवली.

त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

यावेळी संगमेश्वरचे (देवरुख) वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडूकर, अरुण माळी, रेस्क्यू टीम देवरुखचे दिलीप गुरव, निलेश मोहिरे, मिथील वाचासिद्ध, पोलीस पाटील दीपक सावंत, सरपंच जयंत देसाई आदी उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा 7757975786 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने तौफीक मुल्ला यांनी केले आहे.

हेही वाचा 

Back to top button