लांजा दुहेरी खून प्रकरण : संदेशला संपवायचे होते अख्खे कुटुंब | पुढारी

लांजा दुहेरी खून प्रकरण : संदेशला संपवायचे होते अख्खे कुटुंब

लांजा; पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे गुरुवारी पहाटे पत्नी आणि मुलाचा खून केल्याचे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले होते. घटनेनंतर आरोपी संदेश रघुनाथ चांदवडे (35) हा फरार झाला होता. अखेर त्याला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेत आरोपीला आपले संपूर्ण कुटुंबच संपवायचे होते, असे तपासात उघड झाले आहे.

सोनाली ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असायची. यातून सून, सासू आणि नवरा यांच्यात वारंवार खटके उडायचे. याची माहिती तिच्या माहेरीही संदेशने दिली होती. त्यानंतर जुलै महिन्यात संदेश हा पत्नी सोनाली आणि मुलांसह लांजा येथे भाड्याची खोली घेऊन राहात होता. दि.19 जुलैरोजी सोनाली ही नवरा संदेश याला चिठ्ठी लिहून मुलांना तिथेच सोडून गायब झाली होती. त्यानंतर संदेशने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. 29 जुलैरोजी सोनाली हिने पुन्हा संदेशला फोन करून मला तुझ्याकडे राहायला यायचे आहे, असे सांगितले होते. त्यानंतर संदेश सोनालीला घेऊन पोलिस ठाण्यात गेला होता. पोलिसांनी दोघांचे समुपदेशन करून घरी पाठवले
होते.

दि. 3 ऑगस्टरोजी पहाटे 4 च्या सुमारास सोनाली ही पनवेलला जायला निघाली होती. यातून नवरा बायकोत वाद झाला. पत्नी सोनाली ही घराच्या पाठीमागे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेली असता संदेशाने पाठीमागून तिच्या मानेवर कोयत्याने वार केला. यात सोनालीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर संदेश याने मुलगा प्रणव याचा तोंडावर उशी दाबून त्याचाही खून केला.

Back to top button