Sindhudurg News: मुंबई-गोवा महामार्गावर वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष; हरित महामार्ग कागदावरच | पुढारी

Sindhudurg News: मुंबई-गोवा महामार्गावर वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष; हरित महामार्ग कागदावरच

सिंधुदुर्ग: सचिन राणे: सिंधुदुर्ग (Sindhudurg News) जिल्ह्यात खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप टप्यात मुंबई – गोवा महामार्गाचे काम भूसंपादन रखडलेली ठिकाणे वगळता उर्वरित पूर्ण झाले आहे. हा महामार्ग हरित महामार्ग बनवण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ठेकेदार कंपनीकडून गेल्या दोन वर्षांपूर्वी दुभाजकात लावलेल्या वृक्षांची वाढ झाली. मात्र, महामार्गाच्या लगत दोन्ही बाजूच्या बहुतांश लावण्यात आलेल्या वृक्षांना उन्हाळ्यात पाणी व पावसाळ्यात संगोपन न झाल्याने वृक्षांची वाढ झालेली नाही. त्यामुळे हरित महामार्ग कधी होणार ? असा प्रश्न पडला आहे.

सध्या पावसाळा असल्याने वृक्ष लागवड ठेकेदार कंपनीकडून करण्याची गरज आहे. मात्र, नवी वृक्ष लागवड होत नसल्याने हरित महामार्ग होणार कधी ? असा सवाल उपस्थित होत आहे. यासाठी हायवे प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. सामाजिक वनीकरण, वनविभाग, ग्रामपंचायत, सेवासंस्था व लोक प्रतिनिधींकडून विशेष पाऊल उचलण्याची गरज (Sindhudurg News) आहे.

चौपदरीकरण करताना महामार्गालगतची हजारो झाडे तोडण्यात आली. दरम्यान पनवेल ते झाराप या महामार्गाची लांबी ४७२ किलोमीटर आहे. गेल्या २० वर्षांपासूनच चौपदरीकरणाची प्रक्रिया आजही सुरू आहे. प्रथम सहा टप्प्यांमध्ये होऊ घातलेले हे चौपदरीकरणाचे काम आता सिंधुदुर्ग सोडला. तर रत्‍नागिरी, रायगड टप्प्यात आजही अपूर्ण आहे. खात्रीदायक मिळालेल्या माहितीनुसार चौपदरीकरण कामामध्ये महामार्गावरील बाधित झाडे तोडावी लागणार असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले होते. मात्र, चौपदरीकरणात झाडे तोडल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा नवीन झाडांची लागवड करणे आवश्यक होते, व तसे ठरलेलेही होते. परंतु आतापर्यंत अशी ठोस लागवड झालेली नाही. ज्या ठिकाणी महामार्ग पूर्ण झाला. अशा ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्षामुळे चौपदरीकरणाचे ९० ते ९५ टक्के काम झाले आहे. तरीही वृक्ष लागवड न झाल्याने निसर्गप्रेमी नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोकणातून वर्षानुवर्षे डोंगर दऱ्यातून, नयनरम्य निसर्गाचा नजराणा डोळ्यात टिपत होणारा प्रवास काँक्रिटीकरणाच्या वेगात लोप पावला आहे. त्यामुळे यापुढे सामाजिक वनीकरण, वनविभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायतीने वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याची गरज आहे. महामार्गाकरिता येणाऱ्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम वृक्षारोपणाकरिता बाजूला ठेवली जाईल. ही रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली जाईल आणि त्यामार्फत वृक्षारोपण केले जाईल, असे धोरणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीकडून पुन्हा वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. याकडे हायवे प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागकडून विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा 

Back to top button