रत्नागिरी : परशुराम घाटातील काँक्रीटला तडे | पुढारी

रत्नागिरी : परशुराम घाटातील काँक्रीटला तडे

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील सुमारे शंभर मीटरच्या अंतरात काँक्रिटीकरण खचले आहे. यामुळे प्रवासी व वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी वाहतुकीला कोणताही धोका नाही, असे स्पष्ट केले आहे.

चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील काम नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. यावर्षी घाट पंधरा दिवस बंद ठेवून अवघड वळणावरील काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. अत्यंत घाईघाईत दरीकडील एक लेन पूर्ण करण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात या काँक्रीटला तडे गेले आहेत. दरीकडच्या बाजूने दहा ते पंधरा फूट उंचीची संरक्षक भिंती बांधून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला. संरक्षक भिंतीच्या उंचीएवढाच हा मातीचा भराव असून भराव पूर्ण झाल्यानंतर त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आणि पहिलाच पाऊस असल्याने या काँक्रिटीकरणाला माती खचल्यामुळे त्याला तडे गेले आहेत. याची दखल मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधले आहे.

या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण येथील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, यावर्षी घाटातील काम पूर्ण करावे यासाठी अत्यंत घाईने काँक्रिटीकरणाची एक लेन पूर्ण करण्यात आली. काँक्रिटीकरण केल्यानंतर सुमारे चौदा दिवस त्यावर कोणतेही वाहन चालवायचे नसते. मात्र, काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेचच पाऊस आल्याने या लेनवरून वाहतक सुरू करण्यात आली. याचा परिणाम म्हणून या काँक्रिटीकरणाला काही ठिकाणी तडे गेले आहेत.

ज्या शंभर मीटरच्या रस्त्याला तडे गेले आहेत त्यांची दुरुस्ती नंतर करण्यात येईल. दरीकडील बाजूची लेन पूर्ण झाल्यानंतर तेथील वाहतूक सुरू झाल्यानंतर तडे गेलेला भाग काढून या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येईल. मात्र अशा परिस्थिती परशुराम घाटातील वाहतुकीला कोणताही धोका नाही. गेलेल्या भेगा सिमेंटच्या माध्यमातून भरून टाकण्यात आल्या आहेत. वाहतुकीला कोणताही धोका पोहोचणार नाही असे राष्ट्रीय विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button