रत्नागिरी : परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला | पुढारी

रत्नागिरी : परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : परशुराम घाटातील अवघड वळणावरील चौपदरीकरणाचे काम मार्गी लागावे, यासाठी हा घाट दि. 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान बंद केला होता. रोज दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत वाहतूक आंबडस मार्गे वळविली होती. मात्र, 16 दिवसांनंतर गुरुवारपासून परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत झाली आहे. आता हा घाट वाहतुकीसाठी चोवीस तास खुला राहणार आहे. दरम्यान, भरावाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वी एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

गेली दोन वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवून काम सुरू केले होते. गतवर्षी तब्बल एक महिना हा घाट बंद होता. मात्र, यावर्षी सोळा दिवसांसाठी रोज पाच तास महामार्ग बंद ठेवून काम सुरू होते.
अजूनही थोडी मुदत वाढवून मिळावी यासाठी कल्याण टोल कंपनीने प्रशासनाकडे अर्ज दिला होता. मात्र, तो अर्ज फेटाळत मुदतवाढ नाकारून दि. 11 रोजी रात्री 12 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक चोवीस तास सुरू केली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागील 16 दिवस गैरसोय

गेले 16 दिवस लोटे औद्योगिक वसाहतीत कामाला जाणार्‍यांना आंबडस-चिरणी मार्गे वळसा पडत होता. अनेक एसटी गाड्या रद्द केल्या होत्या. मात्र, आता महामार्ग खुला झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.

Back to top button