सिंधुदुर्ग : पावशीत शिवसेना, ठाकरे गट आमने-सामने ! | पुढारी

सिंधुदुर्ग : पावशीत शिवसेना, ठाकरे गट आमने-सामने !

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा पावशी घाडीवाडी व मिटक्याचीवाडीतील जलजीवन मिशन कामाच्या भूमिपूजनादरम्यान आ. वैभव नाईक यांना भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. मात्र आ. वैभव नाईक यांनी दोन्ही ठिकाणी भुमीपूजने उरकली व ते मार्गस्थ झाले. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून ‘शिवसेनेचा निषेध असो’ अशा घोषणा दिल्या.

‘हर घर जल’ या संकल्पनेसह भारत सरकारने सन 2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण गावांना नळ कनेकशनद्वारे पुरेसे सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली. त्या योजनेअंर्गत कुडाळ तालुक्यातील पावशी गावात मंजूर कामाचे भुमीपूजन करण्यासाठी आ. नाईक मंगळवारी पावशी गावात दाखल झाले. पावशी घाडीवाडी व मिटक्याचीवाडी येथील कामाचे भुमीपूजन करण्यासाठी ते आले. यावेळी आ. वैभव नाईक यांच्या समवेत तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळा कोरगावकर, सरपंच वैशाली पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, ग्रा.पं. सदस्य निकीता शेलटे, सौ. खोत, सौ. दळवी, वसंत भोगटे, सुशिल चिंदरकर, सागर भोगटे, कृष्णा तेली, संतोष अडुळकर, गणेश वायगणंकर, काका भोगटे, ओंकार शेलटे, तुषार शेलटे, सदानंद पावसकर आदि उपस्थित होते.

यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पावशी घाडीवाडी व मिटक्याचीवाडी जलजीवन मिशन कामाच्या भूमिपूज कामाला विरोध केला. यावेळी शिवसेना ( ठाकरे गट) व भाजपा पदाधिकार्‍यांमध्ये जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. अखेर आ. वैभव नाईक यांनी येथील दोन्ही कामांचे भूमिपूजन केले व ते नियोजित पुढील दौर्‍यासाठी मार्गस्थ झाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. यावेळी भाजपचे ओरोस मंडल युवक अध्यक्ष श्रीपाद तवटे, माजी सभापती राजन जाधव, रमेश कुंभार, वृणाल कुंभार, सौ. पंडीत मॅडम, लिना पवार, ओंकार करंगुटकर व स्वरूप वाळके उपस्थित होते.

… तर अशा भूमिपूजनांना आमचा विरोध कायम : तवटे

केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत जो निधी प्राप्त होतो तो निधी पावशी मिटक्याचीवाडी व पावशी घाडीवाडी येथे मंजूर झाला. पावशी धनगरवाडा येथे पाणी पोहचत नाही, याबाबत येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला वारंवार कल्पना देत सदर काम बंद करा अशी विनंती केली. पाणी पुरवठा विभागाने काम बंद करण्याचे तोंडी आश्वासन दिले. असे असताना आ. वैभव नाईक भूमिपूजन कामासाठी स्वतः उपस्थित राहिले. आपण भुमिपूजन केल्यानंतर काम सुरळीत सुरू होईल असे त्यांना वाटले, पण येथील ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. वाद सुरू असतानाच आ. नाईक यांनी नारळ फोडला व ते मार्गस्थ झाले. यापुढे अशा प्रकारची भुमिपूजने होत असतील तर आमचा विरोध कायम राहणार असल्याचे भाजप युवक ओरोस मंडल अध्यक्ष श्रीपाद तवटे यांनी सांगितले.

… तरी तेथील ग्रामस्थ आमदारांसोबतच : नाईक

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेच्या कामांना केंद्र सरकारचा 60 टक्के निधी तर राज्य सरकारचा 40 टक्के निधी उपलब्ध होतो. राज्यातील निधीसाठी स्थानिक आमदारांची शिफारस लागते. पावशी ग्रामपंचायत ही तर शिवसेनेचीच आहे. मागील ग्रामपंचायत शिवसेना ( ठाकरे गट) व आताची ग्रामपंचायत सुध्दा शिवसेना ठाकरे गटाचीच आहे. त्यामुळे त्या निधीवर आ. वैभव नाईक यांचाच अधिकार आहे. विशेष म्हणजे वाद घालण्यासाठी जे विरोधक आले ते कोण होते? तसेच त्या जलजीवन योजनेतील कामाचा पोट ठेकेदार कोण? हे येथील ग्रामस्थांना ज्ञात आहे. आज पावशी येथील भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान ज्यांनी लोकांना भडकविण्याचा प्रयत्न केला ते ग्रामस्थ आमदारांसोबत असल्याची माहिती शिवसेना ( ठाकरे गट) तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button