रस्‍त्‍यावर छेडछाड झालेली महिला पीडिता, तिला आरोपी म्‍हणता येणार नाही : शिल्पा शेट्टीला निर्दोष मुक्‍त करताना मुंबई न्‍यायालयाची टिपण्‍णी | पुढारी

रस्‍त्‍यावर छेडछाड झालेली महिला पीडिता, तिला आरोपी म्‍हणता येणार नाही : शिल्पा शेट्टीला निर्दोष मुक्‍त करताना मुंबई न्‍यायालयाची टिपण्‍णी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रस्त्यावर किंवा सार्वजनिक वाहतुकीत एखाद्या महिलेला हात लावला जातो किंवा तिला स्पर्श केला जातो, अशा वेळी पीडित महिलेला आरोपी म्हणून संबोधले जाऊ शकत नाही. तसेच तिला घटनेसाठी जबाबदार ठरवत अटक केली जाऊ शकत नाही, अशी टिपण्‍णी मुंबई सत्र न्‍यायालयाचे न्‍यायाधीश एस. सी. जाधव यांनी केली. नुकतेच रिचर्ड गेरे चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला निर्दोष मुक्‍त करताना न्‍यायाधीशांनी आपल्‍या ११ पानांच्‍या आदेशात ही महत्त्‍वपूर्ण टिपण्‍णी केली आहे.

Richard Gere kissing case : काय घडलं होतं?

२००७ मध्‍ये राजस्‍थानमध्‍ये ‘एचआयव्‍ही’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे आणि अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी यांची प्रमुख उपस्‍थिती होती. यावेळी रिचर्ड गेरे यांनी शिल्‍पा शेट्टीचे सार्वजनिकपणे चुंबन घेतले होते. या प्रकरणी राजस्‍थानमधील मुंडावार येथे दोघांवरही  भारतीय दंड संहिता ( आयपीसी) कलम २९२, २९३,२९४ ( अश्‍लीलता) तसेच माहिती तंत्रज्ञान आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल झाला होता.

सत्र न्‍यायालयाने दिला होता शिल्पा शेट्टीला दिलासा

प्रकरण मुंबईला हस्तांतरित करण्याच्या शिल्‍पा शेट्टीच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये परवानगी दिली होती, त्यानंतर हस्तांतरण प्रकरणाची सुनावणी मुंबई महानगर दंडाधिकार्‍यांसमोर झाली. अभिनेता रिचर्ड गेरे याच्‍या कृत्‍याला शिल्‍पा शेट्टी बळी पडली, असे निरीक्षण नोंदवत २७ जानेवारी २०२२ रोजी या प्रकरणी महानगर दंडाधिकार्‍यांनी शिल्‍पा शेट्टीची निर्दोष मुक्‍तता केली होती. या आदेशाला महाराष्‍ट्र सरकारने सत्र न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. हा आदेश बेकायदेशीर आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध होता, असे सरकारने म्‍हटले होते. मुंबई सत्र न्‍यायालयाचे न्‍यायाधीश एस. सी. जाधव यांनी हा आदेश कायम ठेवत शिल्‍पा शेट्टीला दिलासा दिला.

रस्‍त्‍यावर छेडछाड झालेली महिला पीडिता : न्‍यायालयाची महत्त्‍वपूर्ण टिपण्‍णी

शिल्‍पा शिल्‍पा शेट्टीला निर्दोष मुक्‍त करण्‍यापूर्वी सत्र न्यायाधीश एस.सी. जाधव म्हणाले की, “शिल्‍पा शेट्टी यांनी रिचर्ड गेरे यांचे चुंबन घेतले नव्हते, तर त्यांनीच चुंबन घेतले होते. त्यामुळे अश्लील कृत्‍य शिल्‍पा शेट्टीने केले नव्‍हते हे स्‍पष्‍ट होते. रस्त्यावर किंवा सार्वजनिक वाहतुकीत एखाद्या महिलेला हात लावला जातो किंवा तिला स्पर्श केला जातो, अशावेळी पीडित महिलेला  आरोपी म्हणून संबोधले जाऊ शकत नाही. तसेच तिला खटल्यासाठी जबाबदार ठरवत अटक केली जाऊ शकत नाही.”

हेही वाचा :

 

 

Back to top button