सिंधुदुर्ग: ‘एप्रिल फूल अन् आमदार गुल’; सावंतवाडीत ठाकरे गटाचे आंदोलन | पुढारी

सिंधुदुर्ग: 'एप्रिल फूल अन् आमदार गुल'; सावंतवाडीत ठाकरे गटाचे आंदोलन

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : सावंतवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात मोनोरेल, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समितीचे नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज (दि. १) ठाकरे गटाच्या वतीने सावंतवाडी एसटी बस स्थानकात आंदोलन करण्यात आले. यावेळी एप्रिल फूल आणि आमदार गुल, अशा घोषणा आणि ढोल वाजवून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. एप्रिल फूल विकास गुल, पन्नास खोके एकदम ओके, अशा घोषणांबरोबर उद्धव ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

मंत्री केसरकर यांनी आश्वासनापलीकडे काहीच काम केलेले नाही. गेली पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विकासकामे प्रलंबित असून मंत्री केसरकर हे फक्त घोषणाबाजी करत आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ, माजी जि.प. सदस्य मायकल डिसोजा, जिल्हा संघटक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, आबा सावंत, तालुका संघटक रश्मी माळवदे, भारती कासार, महिला शहरसंघटक श्रृतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे, राजू शेटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

हेही वाचा 

Back to top button