सिंधुदुर्ग : आचरा रामेश्वर संस्थानात राम जन्मोत्सव दिमाखात संपन्न | पुढारी

सिंधुदुर्ग : आचरा रामेश्वर संस्थानात राम जन्मोत्सव दिमाखात संपन्न

सिंधुदुर्ग (आचरा); उदय बापर्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आचरा येथील इनामदार श्री रामेश्वराच्या मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्य आल्याने उन्हाचे चटके बसत होते. त्याचवेळी १२.३९ वाजण्याच्या मुहूर्तावर रामजन्माची “जय जय रघुवीर समर्थ ” अशी ललकारी आसमंतात दुमदुमली आणि तोफा दणाणल्या… बंदुकीच्या फैरी आकाशात झडू लागल्या… नगारखान्यात नगारे- ताशे झडू लागले… रामजन्म होताच आसमंतात जय जय रघुवीरचा जयघोष दुमदुमू लागला. इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागले. यावेळी संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. आचरा नगरीत साजरा होणाऱ्या राम जन्म उत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक हजर होते.

जिल्ह्यात आज सर्वत्र रामनवमी सोहळा उत्साहात साजरा झाला. श्रीरामाच्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमून गेला. मालवण तालुक्यातील आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थच्या ललकारी बरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.

डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला उत्सव

इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. आचरा पंचक्रोशी पूर्ण १२ दिवस रामनामात दंग झाली होती. भक्तांच्या गराड्यात आचऱ्याचा सांब सदाशिव पुरता दंग झालेला होता. चैत्र शुद्ध नवमीला दुपारी उन्हाचे चटके बसत असूनही भाविकांना उत्कंठा होती ती रामजन्माची. रामेश्वर मंदिराच्या भव्य मंडपात रामदासी बुवांचे कीर्तन सुरू असताना रामजन्म होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत  ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला’ चा जयघोष सुरू झाला. वाद्यांच्या घोषात सजविलेल्या पाळण्यात चांदीची रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. रामजन्मानंतर श्रीच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थच्या घोषात प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी रामनामाची गीते म्हटली जात होती. गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा आज रामनव आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळा उत्सवात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी सहभागी झाले होते. उत्सव सुरक्षित पार पडावा यासाठी देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा, ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व आचरा ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी  विशेष मेहनत घेतली.

हेही वाचा : 

Back to top button