काजूचा दर कोसळतोय, अपेक्षा हमीभावाची! बदलत्या हवामानामुळे काजू पीक संकटात | पुढारी

काजूचा दर कोसळतोय, अपेक्षा हमीभावाची! बदलत्या हवामानामुळे काजू पीक संकटात

सावंतवाडी; हरिश्चंद्र पवार : काजू हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. पण बदलत्या हवामानामुळे काजू उत्पादनात सातत्य राहत नाही. यासाठी काजू बी बरोबरच काजू बोंडे व काजू टरफल प्रकिया उद्योग जिल्ह्यात सुरू झाले तरच शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. राज्याच्या अर्थसंकल्पात काजू बोंडे प्रक्रिया उद्योगासाठी निधीची तरतूद झाल्याने जिल्ह्यात काजू प्रक्रिया उद्योग उभे राहतील व यातून शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होईल. मात्र, काजू बीला हमीभाव कधी मिळणार? याची प्रतीक्षा काजू उत्पादक शेतकर्‍यांना आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 72 हजार हेक्टरवर काजू लागवड आहे. प्रत्यक्षात यातील 59 हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षमता आहे. यातून दरवर्षी सरासरी 1.60 मेट्रीक टन प्रति हेक्टरी काजूचे उत्पादन होते. म्हणजेच 59 हजार हेक्टर क्षेत्रातून दरवर्षी सुमारे 95 हजार मे.टन काजू उत्पादन होते. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 97 मोठे तर, 224 छोटे काजू प्रक्रिया उद्योग आहेत. मात्र, यामधून केवळ 10 हजार 584 मे.टन काजूबी वर प्रक्रिया केली जाते. याचबरोबर कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमध्ये 10 मोठ्या काजू प्रक्रिया उत्पादकांना मान्यता आहे. त्यामधून 20 हजार मे.टन काजू बी वर प्रक्रिया होते. म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादित सरासरी 95 हजार मे.टन काजू पैकी सध्या केवळ 30 हजार मे.टन काजू बी वरच प्रक्रिया होत आहे. म्हणजेच अद्यापही 65 हजार मे.टन काजूवर प्रक्रिया करण्यास वाव आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकन किंवा अन्य देशांतून काजू बी आयात होते. त्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूमध्ये जसा फरक आहे तसाच प्रति किलो दरातील फरकामुळे बागायतदार शेतकर्‍यांना काजू बी कमी किंमतीत विक्री करावा लागतो. व्यापारी आयात काजू दरातील फरकामुळे स्थानिक पातळीवर शेतकर्‍यांना कमी भाव देतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. यास्तव काजू बी ला हमीभाव मिळावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच काजू बोंडे प्रक्रिया प्रकल्प नसल्याने गोवा राज्यातील कारखानदार अल्प भावाने खरेदी करतात. दररोज शेकडो गाड्या काजू बोंडू घेऊन कोकणातून गोव्याकडे जातात. राज्य शासनाने काजूला हमीभाव दिल्यास कोकणातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थसंकल्पात काजूला स्थान मिळाले आता प्रतीक्षा हमीभावाची आहे.

काजू बी व बोंडे प्रक्रिया प्रकल्पाला चालना मिळावी

माणगाव हेडगेवार प्रकल्पमध्ये बोंडे प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यात औषध, रंग व इथॉलिन निर्मिती केली जाते. अशाच प्रकारे काजूवर आधारित प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात सुरू झाल्यास निश्चितच शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होईल अशी अपेक्षा आहे. काँग्रेस राजवटीत काजू बी व बोंडे प्रक्रिया प्रकल्पाला 1:9 भागभांडवल देण्याची घोषणा झाली. त्यामुळे दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात प्रत्येक एक संस्था निर्माण होऊन भागभांडवल उभारणी झाली, पण प्रत्यक्षात शासनस्तरावर प्रयत्न करूनही प्रकल्प उभे राहिले नाहीत, हे दुःख शेतकर्‍यांच्या गाठीशी आहे.

Back to top button