रत्नागिरी : साडे सहा वर्षांपासून शोध घेत असलेल्या आरोपीला खेड पोलिसांनी घातल्या बेड्या | पुढारी

रत्नागिरी : साडे सहा वर्षांपासून शोध घेत असलेल्या आरोपीला खेड पोलिसांनी घातल्या बेड्या

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करून साडे सहा वर्ष नजरेआड झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरात मधून शनिवारी ताब्यात घेतले.

वसीम इम्तियाज शेख (33,रा.कोकंबा आळी,दापोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भादंवि कलम 420,406, व 427 अन्वये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो 6 वर्ष 5 महिने नजरेआड झालेला होता. त्याचा शोध घेऊनही तो मिळत नसल्याने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले होते.

या पथकाला वसीम शेख बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी गुजरात राज्यातील मुस्तंग नगर, उधना यार्ड सुरत येथून ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी खेड पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आले आहे.ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर यांनी केली.

Back to top button