रत्नागिरी : अनधिकृत साई रिसॉर्ट पाडायला मुख्यमंत्र्यांनी पाठवले : सोमय्या | पुढारी

रत्नागिरी : अनधिकृत साई रिसॉर्ट पाडायला मुख्यमंत्र्यांनी पाठवले : सोमय्या

खेड;  पुढारी वृत्तसेवा :  दापोलीतील साई रिसॉर्ट हे तत्कालीन मंत्री अनिल परब यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक असून हे अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवले आहे, असे किरीट सोमय्या यांनी शनिवारी खेड येथे दाखल होताच शहरातील तीनबत्ती नाका येथे जाहीरपणे सांगितले. यावेळी त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला.

किरीट सोमय्या यांचे रेल्वेने खेडमध्ये आगमन झाले. त्या नंतर त्यांचे शिवसेना – भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. वाहनांच्या ताफ्यासह श्री. सोमय्या खेड शहरात दाखल झाले.

या वेळी तीन बत्ती नाका येथे ते म्हणाले की, महाराष्ट्रात यापूर्वी फक्त घोटाळा, भ्रष्टाचार व दादागिरी करणारे सरकार होती. कोव्हिडमध्ये कमाई करायचे काम मंत्री आणि नेते करत होते. गैरमार्गाने मिळवलेल्या पैशातून तत्कालीन मंत्री अनिल परब मुरुडमध्ये रिसॉर्ट बांधत होते. त्यांनी या रिसॉर्टच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्याचे प्रतीक बांधायचे काम केले. या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर साई रिसॉर्ट वाचावे, यासाठी प्रयत्न केले. मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हे भ्रष्टाचाराचे प्रतीक रिसॉर्ट पाडायचे आदेश दिले आहेत. त्यांनी तसेच व देवेंद्र फडणवीस यांनी मला हे रिसॉर्ट पडायचे काम तुम्ही सुरू करा, असे सांगितल्याने त्यांच्या आदेशानुसार मी तेथे जात आहे, असे सोमय्या म्हणाले.

Back to top button