रत्नागिरी : परशुराम घाट 24 तास खुला होणार | पुढारी

रत्नागिरी : परशुराम घाट 24 तास खुला होणार

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असणारा परशुराम घाट गेले कित्येक दिवस धोकादायक ठरत असल्याने वाहतुकीसाठी रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात आला आहे. दिवसभर या रस्त्यावरून वाहतूक सुरू असून, रात्रीच्या वेळी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, आता गणेशोत्सवापूर्वी कोकण वासियांच्या सोयीसाठी परशुराम घाट 24 तास सुरू करण्यात येईल, असे चिपळूणचे आ. शेखर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

गेले अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. यामुळे कोकणवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पडणार्‍या खड्ड्यांमुळे लोकांना या महामार्गावरून प्रवास करणे जिकरीचे बनते. यावर्षीही संपूर्ण महामार्गाची परिस्थिती दयनीय आहे. ठिकठिकाणी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी या महामार्गावरील खड्डे दर्जेदार पद्धतीने भरावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

याबरोबरच परशुराम घाट गणेशभक्तांसाठी 24 तास खुला करावा, अशीही मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर आ. निकम यांना छेडले असता ते म्हणाले की, यासंदर्भात आपण राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील याबाबत कल्पना दिली आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापूर्वी परशुराम घाट 24 तास वाहतुकीसाठी खुला राहील, असे आ. निकम यांनी सांगितले आहे.

सद्यस्थितीत मुंबईकडून येणारी वाहने चिरणीमार्गे तर जाणारी वाहने भेलसाई गुणदेमार्गे आवाशी अशी मार्गक्रमण करत आहेत. या ठिकाणी असणारा अरुंद रस्ता यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने परशुराम घाटात आवश्यक ती डागडुजी तात्काळ करून घ्यावी आणि गणेशोत्सवापूर्वी घाट 24 तास वाहतुकीस खुला करावा, अशी आग्रही मागणी चाकरमानी करीत आहेत.

Back to top button