जि. प. शाळेतील मुलांना शिकवायचं कोणी? या वर्षी तब्बल 989 शिक्षक निघाले परजिल्ह्यात | पुढारी

जि. प. शाळेतील मुलांना शिकवायचं कोणी? या वर्षी तब्बल 989 शिक्षक निघाले परजिल्ह्यात

रत्नागिरी : दीपक कुवळेकर
जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा हा राज्यात सर्वोत्तम गणला जातो. मात्र, गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदची शिक्षक भरती न होवू शकल्याने रिक्त पदांची संख्या वाढतच निघाली आहे. सध्या तर 1 हजार 300 पदे रिक्त आहेत. त्यात आता आंतरजिल्हा बदलीने 989 शिक्षक परजिल्ह्यात जाणार आहेत. तर दुसरीकडे फक्त आठच इतर जिल्ह्यातून शिक्षक जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यामुळे एकंदरित ‘989 आऊट तर 8 इन’ अशी स्थिती होणार असल्याने जिल्ह्यातील मुलांना शिक्षण द्यायचं तरी कसं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता रत्नागिरी जिल्हा हा शिक्षक भरतीचे जणू केंद्रच बनले आहे.

गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात आंतर जिल्हा बदली पात्र शिक्षकांचा विषय चांगलाच गाजत आहे. या प्रक्रियेत राजकीय पुढार्‍यांकडून तसेच पदाधिकार्‍यांकडून प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे. हा विषय जिल्हा परिषदेच्या अनेक सर्वसाधारण सभेतही चांगलाच गाजला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या 989 शिक्षकांचे प्रस्ताव आंतर जिल्हा बदलीने बदलून जाण्यासाठी प्रलंबित आहेत. जिल्हा बदलून जाणार्‍यांची संख्या बघता जिल्ह्यात येणार्‍यांची संख्या फारच कमी आहे. सध्या फक्त 8 शिक्षकांचे प्रस्ताव आंतर जिल्हा बदलीने बदलून येण्यासाठी प्रलंबित आहेत.

गेल्या पाच वर्षांत जिल्हा बदलून जाणार्‍या शिक्षकांना अगदी कोणताही अडथळा न आणता मुक्त हस्ते जि. प. प्रशासनाने सोडले; पण जिल्ह्यात येणार्‍या शिक्षकांना घेताना अनेक अडचणी उभ्या करून प्रशासनाचे हात आकडले जातात, असा आरोप अनेक वेळा राजकीय पुढारी तसेच पदाधिकारी करताना दिसतात आणि यामुळेच सर्वसाधारण सभेत खडाजंगी होते. राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार आता दरवर्षी शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीत बाहेरच्या जिल्ह्यात सर्वाधिक वर्षे काम करणार्‍या शिक्षकांची नावे अग्रक्रमावर राहणार आहेत. तसेच आंतर जिल्हा बदली शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेताना सात प्रकारांतील शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहेत. यात विधवा, परित्यक्ता, सैनिक, दुर्धर आजारी व्यक्ती, पती-पत्नी एकत्रिकरण आणि शेवटची एकतर्फी बदली पात्र शिक्षकांना सामावून घेण्यात येणार आहे.

गेल्या 4 वर्षांपासून आंतरजिल्हा बदल्यांना खो बसला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील -गुरूजींचा हिरमोड झाला होता. मे पर्यंत बदल्या होतील असा चंग गुरूजींनी बांधला होता. मात्र, ती कार्यवाही काही झाली नाही. राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे दि. 13 ऑगस्टपर्यंत बदल्यांची कार्यवाही होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग कामाला लागलाआहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने सन 2018-19 मध्ये आंतरजिल्हा शिक्षक बदलीसाठी एक सॉफ्टवेअर विकसीत केले होते. पण, त्यामध्ये त्रुटी होत्या. ही प्रक्रिया सुरू असतानाच सन 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. सन 2020-21 व 2021-22 या दोन वर्षांत शाळा बंद असल्यामुळे बदली प्रक्रियेची कार्यवाही झाली नाही. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात आंतरजिल्हा बदली करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी आता विन्सीस आयटी या पुण्यातील कंपनीने सॉफ्टवेअर विकसित केले.

Back to top button