रत्नागिरी : पावस येथे एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

रत्नागिरी : पावस येथे एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पावस येथे झालेल्या दुचाकी आणि एसटीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.८ जुलै) सकाळी १० च्या सुमारास घडला. विनित अनिल गोताड (५०, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे अपघात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पावस ते गावडे आंबेरे जाणार्‍या रस्त्यावरील स्वामी भक्तनिवास येथील वळणावर विरुध्द बाजुला येऊन दुचाकीने एसटीला समोरुन धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विनित गोताड यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वर्दी एसटी चालक माणिक गंगाधर दहीफळे (38,रा.माळनाका,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात दिली आहे.

शुक्रवारी सकाळी चालक माणिक दहीफळे हे ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-0180) घेऊन हर्चे-पावस ते रत्नागिरी असे येत होते. त्याच सुमारास विनित गोताड आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एआर-0046) घेउन भरधाव वेगाने पावस ते गावडे आंबेरे असे जात होते. ही दोन्ही वाहने स्वामी भक्तनिवास येथील वळणावर आली असता गोताड यांचा आपल्या दुचाकिवरील ताबा सूटला आणि त्यांनी रस्त्याच्या विरुध्द बाजुला येत समोरुन येणार्‍या एसटीला ड्रायव्हर बाजुकडील भागातला धडक देत अपघात केला. ही धडक इतकी जोरदार होती कि त्यात विनित गोताड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पूर्णगड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे. अधिक तपास पोलिस संदेश चव्हाण करत आहेत.

Back to top button