लग्न समारंभाहून परताना दुचाकी-आयशरची धडक, दोघे ठार | पुढारी

लग्न समारंभाहून परताना दुचाकी-आयशरची धडक, दोघे ठार

जिंतुर, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील परतूर येथे लग्न समारंभाहून परताना दुचाकीला भरधाव आयशरने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवार (दि. २७) रोजी सायंकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवासी शिवहारी विठ्ठल मस्के (वय ४०), त्याची पत्नी चंद्रकला शिवहारी मस्के (वय ३५ ) आणि साडू संजय वाघमारे (वय ५०, सातोना, ता. परतूर ) हे तिघेजण दुचाकीवरून परतूर येथे लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न संभारंभ आटोपून ते साडू संजय वाघमारे याला सातोना येथे सोडण्यास जात असताना परतूर सेलू रोडवरील चिंचोलीजवळ भरधाव आयशरने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीवरील संजय वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान चिंचोली ग्रामस्थांनी तातडीने यातील दोघा जखमींना उपचारासाठी परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर जखमींची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातातील चंद्रकला मस्के ही गंभीर असल्याने त्‍यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान जोगवाडा येथील शिवहारी विठ्ठल मस्के याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचा पश्चात पत्नी, आई वडील, दोन मुले असा परिवार आहे. या अपघातप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button