विधानसभा अध्यक्षपद निवड : राज्यपाल कोश्यारी यांनी उधळले मनसुबे | पुढारी

विधानसभा अध्यक्षपद निवड : राज्यपाल कोश्यारी यांनी उधळले मनसुबे

मुंबई, पुढारी ऑनलाईन : विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लाल दिवा दाखविल्याने ही निवड अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनातच अध्यक्ष निवड करण्याचे महाविकास आघाडीचे मनसुबे राज्यपालांनी उधळून लावले आहेत.

यंदाच्या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी २८ डिसेंबर रोजी ही प्रक्रिया होणार होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून राज्य सरकारने निवडणूक घेण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव सोमवारी राज्यपालांना पाठविला होता. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यास मंजुरी दिली नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानेही राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून अधिकारांची जाणीव करून दिली होती. त्यामुळे आज निवड होणार की नाही याबाबत प्रतीक्षा होती. अखेर मंगळवारी सकाळी ११ वाजता राज्यपालांनी बंद लिफाफ्यात पत्र पाठवून निवडीला आक्षेप घेतला.

राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आक्षेप घेतला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यांनी या निवडणुकीसाठी नकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आणि वादात निवड होण्यापेक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवड केली जावी असे ठरले.

राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोघांनी फोनवर चर्चा केली असून यामध्ये राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवडणुका घेतल्यास कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या अधिवेशनात निवडणूक घेण्याऐवजी मार्च महिन्यात निवड करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

 काँग्रेसनेही घेतले नाही विश्वासात

महाविकास आघाडीमध्ये पदांच्या वाटणीत अध्यक्षपद काँग्रेसच्या वाटणीला गेले होते. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडताना सहकारी पक्षांना विश्वासात घेतले नव्हते. त्यांनी अचानक राजीनामा दिला होता. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेच निवडणूक होईल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांना टोलवत ठेवले. अखेर ही निवड आता वादात सापडली आहे.

हेही वाचा 

Back to top button