जळगावमधील मुदत संपलेल्या नगरपालिकांवर हाेणार प्रशासकांची नियुक्ती | पुढारी

जळगावमधील मुदत संपलेल्या नगरपालिकांवर हाेणार प्रशासकांची नियुक्ती

जळगाव, पुढारी वृत्तसेवा

ओबीसी आरक्षणप्रश्‍नामुळे मुदत संपलेल्या नगरपालिका व महापालिकांच्‍या निवडणुका पुढे ढकलण्‍याचा प्रस्ताव विधानसभेत साेमवारी   मंजूर करण्‍यात आला.  त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 12 नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याचा जीआर नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यातील 12 नगरपालिकांवर प्रशासक असणार आहे

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. यातील नगरपंचायतींची निवडणूक २१ डिसेंबर रोजी घेण्यात आली. यातच ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न देखील कायम असल्याने तेथेही आरक्षण नसलेल्या जागांवर निवडणूक झाली आहे.ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सुटत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा ठराव विधानसभेत संमत करण्‍यात आला आहे.

या पार्श्‍वभूमिवर, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून या महिन्याच्या अखेरीस मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर प्रशासक नियुक्त करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या जीआरमध्ये नाशिक विभागातील नगरपालिकांचाही समावेश आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १२ नगरपालिकांचा समावेश आहे.

या नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती

१) भुसावळ – उपविभागीय अधिकारी

२) अमळनेर – उपविभागीय अधिकारी

३) चाळीसगाव – मुख्याधिकारी

४) चोपडा – उपविभागीय अधिकारी

५) पाचोरा – उपविभागीय अधिकारी

६) पारोळा – मुख्याधिकारी

७) धरणगाव – मुख्याधिकारी

८) एरंडोल – मुख्याधिकारी

९) फैजपूर – मुख्याधिकारी

१०) रावेर – उपविभागीय अधिकारी

११) सावदा – उपविभागीय अधिकारी

१२) यावल – उपविभागीय अधिकारी

जळगाव जिल्ह्यातील या नगरपालिकांची मुदत ही २९ डिसेंबर रोजी संपत आहे. परिणामी ३० डिसेंबरपासून संबंधित नगरपालिकांमधील नगराध्यक्ष आणि अन्य नगरसेवकांचे वर्चस्व समाप्त होणार असून, आता सर्व ठिकाणी प्रशासक राज सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

Back to top button