जालना : वीज खंडित झाल्यास घरबसल्या तक्रार करा | पुढारी

जालना : वीज खंडित झाल्यास घरबसल्या तक्रार करा

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात महावितरणचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अशा वेळेस अनेक ग्राहकांना वीज कार्यालयाचा नंबर माहिती नसतो. तसेच तक्रारीसाठी कार्यालयात जाण्यासाठी वेळही नसतो. अशा स्थितीमध्ये आता महावितरणला ऑनलाइन तक्रार करणे शक्य आहे.

महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने घरबसल्या ग्राहकांना तक्रार तसेच महावितरणच्या इतरही सुविधांचा वापर करता येणार आहे. महावितरणाने मोबाइल अ‍ॅप तयार केले असून, या अ‍ॅपद्वारे ग्राहकांच्या विविध समस्या सोडवल्या जातात. गुगल प्ले स्टोअर वरून हे अ‍ॅप ग्राहकांना डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपमध्येच मीटर रीडिंग घेण्याची सुविधा, ग्राहकाच्या घराजवळील कार्यालये, वीज बिल भरणा केंद्रे, नवीन जोडणी- अर्जाची सद्य:स्थिती, पुनर्जोडणी शुल्कांबाबत पारेषणचे विरहित सौर कृषिपंप अर्जाची स्थिती, गो ग्रीन, ग्राहक सेवा केंद्र आदी विषयांची माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. वीजचोरी कळवण्याची सोयदेखील अ‍ॅपमध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. ‘महावितरण’चे अ‍ॅप डाऊनलोड करणार्‍यांची संख्या ही जिल्हानिहाय सांगणे कठीण आहे. परंतु, महावितरणचे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करणार्‍या ग्राहकांची एकूण संख्या अधिक आहे.

अ‍ॅपवर काय सुविधा?

मोबाइल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना वीज देयक भरणा करता येते, तसेच भरलेल्या वीज देयक पाहता येऊ शकते. ग्राहक सेवेशी संबंधित संपर्क क्रमांक व ई-मेलवर तक्रार अथवा समस्यांची सोडवणूक करू शकतो.

महावितरण अ‍ॅप कसे डाऊनलोड कराल?

महावितरणचे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाऊनलोड करता येते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर गेस्ट अथवा महावितरणचा 12 अंकी ग्राहक क्रमांक टाकून अ‍ॅपमध्ये लॉगिन ग्राहकांना करता येईल.

अ‍ॅपवर ग्राहकांचे रेकॉर्डही उपलब्ध
महावितरणच्या अ‍ॅपमुळे ग्राहकांना महावितरणच्या सर्व सुविधांचा लाभ घरबसल्या कार्यालयात न जाता घेता येतो. आपल्या घरचा किंवा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला तर त्याच्या दुरुस्तीसाठीची तक्रार आता थेट महावितरणच्या अ‍ॅपवरून करता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी मोबाइलवर अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्याशिवाय अ‍ॅपवर ग्राहकांच्या रेकॉर्डही उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी अ‍ॅपचा वापर करावा.

Back to top button