सातारा अतिवृष्टी : अतिवृष्टीमुळे माणसांच्या 49 छावण्या | पुढारी

सातारा अतिवृष्टी : अतिवृष्टीमुळे माणसांच्या 49 छावण्या

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. पाऊस, भूस्खलन यामुळे घरांचे नुकसान होऊन अनेक संसार उघड्यावर आले.

पावसाने छत हिरावलेल्याने सुमारे 5 हजार 332 लोकांसाठी 49 छावण्या उभारण्यात आल्या आहेत. दुष्काळात जनावरांच्या छावण्या पडल्या होत्या. आता अतिवृष्टीने माणसांच्या छावण्या उभारण्याची दुर्देवी वेळ आली आहे.

तीन वर्षांपासून जिल्हा दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन यासारख्या आस्मानी संकटांशी झुंज देत आहे. यावर्षी कोरोना संसर्ग काळात जिल्ह्यावर अतिवृष्टीची आपत्ती कोसळून पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये हाहाकार उडाला.

जिल्हा प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे सुमारे 1 हजार 793 कुटुबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये 7 हजार 530 लोकांचा समावेश आहे.

पाटण तालुक्यातील 327 कुटुंबातील 1 हजार 307 लोक, महाबळेश्वर तालुक्यातील 66 कुटुंबातील 203 लोक, वाई तालुक्यातील 69 कुटुंबातील 342 लोक, जावली तालुक्यातील 43 कुटुंबातील 146 लोक, कराड तालुक्यातील सर्वाधिक 1 हजार 288 कुटुंबातील 5 हजार 532 लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

काही कुटुंबांनी नातेवाईक, पाहुणे यांच्याकडे बाडबिस्तारा हलवला आहे. तर काही ठिकाणी, शाळा, समाजमंदिर, मंदिरे आदी सार्वजनिक ठिकाणी बाधित कुटुंबांचा पडाव पडला आहे.

या कुटुंबांना प्रशासनाकडून तसेच सेवाभावी संस्थांकडून मदत दिली जात आहे. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी त्यासाठी वेळ लागणार आहे. पाऊस कमी होऊन नदी पाणीपातळी कधी कमी होतेय, याची वाट ही कुटुंबे बघत आहेत. आपल्या मूळ गावात पुन्हा जाण्यासाठी ही कुटुंबे आसुसली आहेत.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव व कराडच्या काही टंचाईग्रस्त भागाने जनावरांच्या छावण्या पाहिल्या आहेत. आता जिल्ह्याच्या पश्चिम भागात माणसांच्या छावण्या पडल्या आहेत.

अतिवृष्टीने या भागाचे प्रचंड नुकसान केले. हजारो गावे बाधित झाली आहे. भूस्खलन होवून कुणाचे घर गाडले गेले तर, अतिपावसाने कुणाचा निवारा हिरावला गेला. जमीन भेगाळू लागल्याने लोकांना राहती ठिकाणे सोडावी लागली. पाटण, जावली, वाई, महाबळेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये आश्रयाला जागा उरली नाही.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाला बाधित कुटुंबांच्या छावण्या उभाराव्या लागल्या आहेत. माणसांच्या या छावण्यांमध्येच त्यांना जेवण आणि अन्नपदार्थ्यांची पॅकेट्स पाठवली जात आहेत.

पाटण तालुक्यात माणसांच्या सर्वाधिक 42 छावण्या आहेत. त्यानंतर कराड व वाई तालुक्यातही काही ठिकाणी तात्पुरत्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

या तीन तालुक्यांमध्ये एकूण 49 छावण्या आहेत. त्यामध्ये सुमारे 5 हजार 332 लोकांनी आश्रय घेतला आहे. काही गावांमध्ये अद्यापही मदत कार्य सुरु आहे.

त्यामुळे आश्रितांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून तात्पुरती घरे बांधून दिली जाणार असली तरी तूर्त या छावण्या बाधितांना दिलासा देणार्‍या ठरल्या आहेत.

बाधितांना मदतीची गरज…

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना अतिवृष्टीमुळे दैना उडाली आहे. जिल्हावासीयांवर काळ तर मोठा कठीण आला आहे. दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्याच्या पश्चिम तालुक्यांनी पूर्वेकडील तालुक्यांना नेहमी मदत केली आहे.

आता पश्चिम भागात अतिवृष्टीने हाहाकार माजवला. काही तालुके उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक लोकांना अन्न-पाण्याची भ्रांत आहे. बाधितांना मदतीची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य, किट तसेच जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात येत आहेत. मात्र, अजून मदतीची गरज असल्याने दानशुरांनी मदतीसाठी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Back to top button